जमिनीच्या वादाचा निकाल सकारात्मक लावण्यासाठी २५ हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयातील एका महिला सहायकास भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या पथकाने तर ओळखपत्र देण्यासाठी एका विणकराकडून ८ हजार रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी विणकर सेवा केंद्राच्या उपसंचालकास सीबीआयच्या पथकाने बुधवारी पकडले. गैरप्रकाराच्या माहितीवरून मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ क्षेत्रीय अभियंत्याविरुद्धही सीबीआयने गुन्हा दाखल केला.
वामन सहारे यांच्या वडिलोपार्जित १३.१६ हेक्टर आर शेत जमिनीची सहा भावांमध्ये वाटणी होऊन त्यांच्या वाटेला ०.५२ हेक्टर आर जमीन आली. २००५ मध्ये सातबारा प्रमाणपत्रात वामनच्या ऐवजी त्यांच्या मोठय़ा भावाचे नाव आहे. वामनने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी वामनच्या बाजूने निकाल दिला. वामनच्या मोठय़ा भावाने त्या निकालास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील केले. महसूल खात्याचे अतिरिक्त आयुक्त संजयसिंह गौतम यांच्याकडे हे प्रकरण सुनावणीसाठी आले. अकरावेळा त्याची सुनावणी झाली. त्यांच्या कार्यालय सहायक टीना ठाकूर यांनी वामनची भेट घेऊन ‘तुमच्या बाजूने निकाल लावण्यासाठी गौतम साहेबांना ४० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्या भावाच्या बाजूने निकाल दिला जाईल’ असे सांगितले. वामन सहारे यांनी भ्रष्टाचार खात्याच्या अधीक्षकांची भेट घेऊन तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर सापळा रचण्याचे आदेश वर्धा युनिटला देण्यात आले. भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी सापळा रचण्यात आला. आरोपी टिनाने ४० ऐवजी २५ हजार रुपये घेऊन बुधवारी बोलावले होते. सहारे दुपारी तेथे गेले तेव्हा तिने त्यांना थांबण्यास सांगितले. दुपारनंतर तिने वामनकडून २५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर तिला पकडण्यात आले.
मोहम्मद कादीर शेख तय्यब (रा. ताजनगर) व त्याचे काका विणकर असून त्या दोघांना ओळखपत्र हवे होते. त्यासाठी त्यांनी विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक एच.बी. सूर्यवंशी यांची त्याने भेट घेतली. ‘दोन्ही ओळखपत्रासाठी एकूण आठ हजार रुपये द्यावे लागतील’, अशी मागणी सूर्यवंशी यांनी मोहम्मदला केली. त्याने सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांची भेट घेऊन तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. बुधवारी दुपारी मोहम्मदकडून आठ हजार रुपये स्वीकारल्यानंतर आरोपी सूर्यवंशीला पोलीस निरीक्षक नीरज गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकाने पकडले.
एका प्रकरणात गैरप्रकार केल्याच्या माहितीवरून मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय वरिष्ठ क्षेत्रीय अभियंता आर. के. शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अजनीस्थित त्यांच्या कार्यालयाची पोलीस निरीक्षक मनोज नायर यांच्या नेतृत्वाखालील सीबीआयच्या पथकाने बुधवारी झडती घेतली. मोठय़ा प्रमाणात तेथून कागदपत्रे जप्त करण्यात आली.