ग्रामसेवकास अद्दल घडवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाने राष्ट्रध्वज लपवून ठेवल्याने तालुक्यातील बाबुर्डी येथे चक्क पावणेदहा वाजता प्रजासत्ताकदिनाचे ध्वजारोहण झाले. राष्ट्रध्वज न सांभाळल्याबद्दल ग्रामसेवक तसेच तो लपवून ध्वजारोहणास उशीर केल्याबद्दल प्राथमिक शिक्षकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रविवारी सकाळी ग्रामसेवक आर. यू. पटेकर हे ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले, त्या वेळी कार्यालयात राष्ट्रध्वज नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोध घेऊनही तो सापडला नाही, तोपर्यंत ध्वजारोहणाची वेळही टळून गेली. ग्रामपंचायतीत ध्वजारोहण न झाल्याची माहिती गावभर पसरल्यानंतर ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाले. संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी तसेच पोलीस प्रशासनास त्याची माहिती दिली. राष्ट्रध्वज सापडत नसल्याने भांबावून गेलेल्या ग्रामसेवक पटेकर यांनी गवळी यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईला राष्ट्रध्वज देण्याची विनवणी केली. गवळी यांच्या आईने घरातून राष्ट्रध्वज काढून दिल्यानंतर पटेकर यांचा जीव भांडय़ात पडला.
पावणेदहाच्या सुमारास सरपंच रमेश गवळी यांनी राष्ट्रध्वज फडकवला. तोपर्यंत विस्तार अधिकारी टी. एम. तुपे व त्यांचे सहकारी बाबुर्डीत दाखल झाले. त्यांनी सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थांचे जबाब नोंदविले. ते सुरू असताना पोलीसही तेथे दाखल झाले. हलगर्जीपणा करणारा ग्रामसेवक व राष्ट्रध्वज घरी लपवणा-या शिक्षकावर कारवाई झाली पाहिजे या मागणीवर ग्रामस्थ ठाम होते. ध्वजारोहणानंतर ग्रामसभेतही हाच विषय ऐरणीवर होता.
मिळालेल्या माहितीनुसार ग्रामसेवक पटेकर हे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे रहातात. आठवडय़ातील एकदोन दिवस बाबुर्डी येथे येतात. गेल्या स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्टला प्राथमिक शिक्षक दत्तात्रय गवळी यांना सायंकाळी ध्वज उतरवण्यास त्यांनी सांगितले होते. त्यानंतर राष्ट्रध्वज शिक्षक गवळी यांच्याच ताब्यात होता. काही दिवसांपूर्वी त्यांचे या शिक्षकाशी वाद झाले होते. त्यामुळे ग्रामसेवकास धडा शिकविण्यासाठी शिक्षक गवळी यांनी राष्ट्रध्वज लपवल्याची माहिती समजली.
 लष्करी शिस्तीचे गाव
लष्करातील सैनिक व माजी सैनिकांचे गाव म्हणून बाबुर्डीची ओळख आहे. त्यामुळे तेथील लोकांमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान पहावयास मिळतो. याच गावात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.