डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेजवळील रेल्वेवरील उड्डाण पूल उभारताना या पुलाचा भाग थेट ठाकुर्ली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबानगर झोपडपट्टीवरून खंबाळपाडा येथील रस्त्याला जोडण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. विकास आराखडय़ातील रस्त्याच्या रूपरेषांमध्ये बदल करून हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. असे करताना या भागातील स्थानिक रहिवाशांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे बुधवारी कल्याणमधील पालिका मुख्यालयासमोर सुमारे दोनशे कुटुंबासह उपोषणाला बसणार आहोत, अशी माहिती भाजपचे ठाकुर्ली-चोळे भागाचे नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी दिली.  
म्हसोबानगर झोपडपट्टी ही रेल्वेच्या हद्दीत येते. या झोपडपट्टीला लागून पालिकेचा विकास आराखडय़ातील २४ मीटरचा रस्ता आहे. या रस्त्यामधील १५ मीटरच्या रूपरेषेची हद्द रेल्वेच्या जागेत दाखविण्यात आली आहे. यानुसार नवीन पुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जोशी शाळेकडून सुरू होणारा पूल थेट म्हसोबानगर झोपडपट्टीवरून खंबाळपाडा येथील रखडलेल्या रस्त्याला जोडण्याचा पालिकेची योजना आहे. हा नवीन आराखडा रेल्वे, पालिका अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता तयार केला आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी एका विकासकाच्या सोयीसाठी हे सर्व चालविले आहे, असा आरोप  नगरसेवक चौधरी यांनी केला. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांची दिशाभूल तयार करून करण्यात आलेल्या पुलाच्या आराखडय़ाला पुलाचे काम सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून अडथळा आणला जाईल आणि या पुलाच्या कामासाठीचे सुमारे ४२ कोटी रूपये पाण्यात जातील, अशी भीती चौधरी यांनी व्यक्त केली आहे. या भागात पूल झाल्यास झोपडपट्टीतील शेकडो कुटुंबे बेघर होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.