गोखले कॉलेज ते ध्यानचंद हॉकी स्टेडीयम मार्गावर आय टी पार्क परिसरात भरधाव डंपरने तिघांना उडवले. सकाळी  १० वाजण्याच्या सुमारास  ही घटना घडली. या अपघातात  दोन जण ठार तर  अन्य एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर टँकरचालक फरारी झाला. अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने डंपरवर दगडफेक करून तो पेटवण्याचा प्रयत्न केला.
     या बाबत पोलिसांनी सांगितलेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी  हॉकी स्टेडीयम पासून गोखले कॉलेजच्या दिशेने एक भरधाव डंपर (क्रं.एम.एच.१०  ए ६६८१) आला. भारती विद्यापीठाच्या न्यु लॉ कॉलेज समोर डंपर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या दुभाजकाला डंपरने जोराची धडक दिली. यामुळे त्याचे स्टेअिरग डाव्या बाजूला वळले आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या मोटारसायकलस्वारांना त्याने उडवले. या धडकेत  (एमएच ०९ एक्स ६२३९)दुचाकीवरील विशाल चंद्रकांत पाटील (वय,२५ रा. कौलव, ता.राधानगरी) हा जागीच ठार  झाला. त्याच्यासोबत त्याच्या मोटारसायकलवर असलेला त्याचा साथीदार राजेंद्र आनंदा डोंगळे (वय २८,रा.बेलवळे खुर्द, ता.कागल) हा गंभीर जखमी झाला हेता. त्याला नागरिकांनी उपचारासाठी तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील (एम.एच.०९ ए.आर ३०८८)  मििलद प्रभाकर कुलकर्णी (वय ४९,रा.रामानंदनगर,कोल्हापूर)हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच  त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. विशाल उमा टॉकीज जवळ असलेल्या एका पॅथोलॉजी लॅबमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करत होता. त्याच्या पाठिमागे आई, वडील, विवाहित बहीण व मोठा भाऊ असा परिवार आहे. अपघाताची माहिती नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. नातेवाईकांचा आक्रोश हृदय  पिळवटून टाकणारा होता. अपघातानंतर डंपरच्या चालकाने पळ काढला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत डंपरचे केबीन पेटवले. यानंतर जमावाने डंपरची डिझेल टाकी फोडून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके व पोलिस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. वातावरण तणावपूर्ण असल्याने पोलिसांची जादा कुमक या ठिकाणी मागवण्यात आली. घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मस्के करत आहेत.