जिल्ह्यातील ७१० गावांत नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पावसाळ्यानंतरच्या सार्वजनिक पिण्याच्या पाणी स्रोतांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले खरे; परंतु केवळ दोन प्रयोगशाळा हा भार ३ महिन्यांत पेलू शकतील काय, अशी चर्चा होत आहे.
पाणीपुरवठा-स्वच्छता विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी यांच्या आदेशान्वये जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या स्रोतांबाबत तपासणी अभियानाविषयी फर्मान काढले आहे. जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पूर्ण करायची आहे. ग्रामपंचायतीतील जल सुरक्षकांच्या साह्य़ाने प्रत्येक सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचा पाणी नमुना पांढऱ्या रंगाच्या दोन लिटर कॅनमध्ये घेऊन जवळच्या उपविभागीय शाळेत स्वत घेऊन जायचा आहे. अभियान सुरळीत पार पाडण्यास, तालुकानिहाय उपविभागीय प्रयोगशाळा यांच्याशी समन्वय साधून ग्रामपंचायतनिहाय पाणी नमुना तपासणी वेळापत्रक जोडण्यासही कळविले आहे. अभियानात कोणत्याही प्रकारे दिरंगाई वा हलगर्जीपणा आढळून आल्यास जबाबदार धरले जाईल, असा इशारा दिला आहे. तपासणीच्या निमित्ताने काही सूचनाही केल्या आहेत. यात पाण्याचा नमुना घेतल्यानंतर शक्यतो २४ तासांत पाठवावा, प्लॅस्टिक कॅनच्या झाकनाला िडक लावू नये, पाणी गोळा करण्याची पद्धत, विहिरीच्या पाण्याचा नमुना घेण्याची पद्धत आदी सूचना यात केल्या आहेत.
जिल्ह्यातील ७१० गावांमधून पाणी स्रोतांचे नमुने तपासणीसाठी केवळ कळमनुरी व वसमत येथेच प्रयोगशाळा आहेत. मात्र, या दोन प्रयोगशाळा ३ महिन्यांत ७१० गावांमधील पाणी स्रोतांचे नमुने तपासणीचा भार कसा काय पेलणार? अशी चर्चा होत आहे.