15 December 2017

News Flash

कॉल सेंटरमधील दोन तरुणींकडून सिग्नल मोडून पोलिसालाही मारहाण

सिग्नल बंद झाल्यानंतर दुचाकी घसरून पडलेल्या दोन तरुणींनी वाहतूक पोलीस शिपायाला मारहाण केली. शिवाजीनगर

प्रतिनिधी, पुणे | Updated: January 5, 2013 1:35 AM

सिग्नल बंद झाल्यानंतर दुचाकी घसरून पडलेल्या दोन तरुणींनी वाहतूक पोलीस शिपायाला मारहाण केली. शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट चौकात शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघी तरुणींना अटक करण्यात आली आहे.
पूजा अमित सोनीवर्मा (वय २४) आणि भावना निखिल दुसंगे (वय २८, रा. श्रीहंस गार्डन, धानोरी) अशी अटक केलेल्या तरुणींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई ए. डी. शेलार यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघी कॉल सेंटरमध्ये कामाला आहेत. शेलार हे शुक्रवारी सकाळी पाटील इस्टेट चौकात वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी या दोघी संगमवाडी पुलाकडून अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे येत होत्या. पाटील इस्टेट चौकातील सिग्नलचा लाल दिवा लागल्यानंतर शेलार यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. तरीही या तरुणी तशाच जात असताना शेलार यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दुचाकीचा वेग जास्त असल्यामुळे दुचाकी घसरली व त्या पडल्या. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करत शेलार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शेलार यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना मारहाण केली. या गोंधळामुळे नागरिक जमले. याप्रकरणी दोघींविरुद्ध मारहाण केल्याबद्दल व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. के. गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.

First Published on January 5, 2013 1:35 am

Web Title: two ladies from call center broke signal and beat police