दरवाजा उघडा ठेवून घरामध्ये टीव्ही पाहात बसणे सासू-सुनेला चांगलेच महागात पडले. संध्याकाळी घरात घुसलेल्या दोघा भामटय़ांनी सुनेला तलवारीचा धाक दाखवून गळय़ातील सोन्याची पोत व कपाटाचे कुलूप तोडून २ लाख ६ हजार ८०० रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम लुबाडून नेली. सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला.
मंगळवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास काचीवाडा परिसरात हा प्रकार घडला. वंदना प्रमोद पाटणी (वय ४२, काचीवाडा, औरंगाबाद) यांनी बुधवारी या प्रकरणी फिर्याद दिली. पाटणी व त्यांची सासू अशा दोघी घरात टीव्ही पाहात बसल्या होत्या. दरवाजा उघडा असल्याचे पाहून आरोपी आदिल चाऊस (पूर्ण नाव नाही, काचीवाडा) व जावेद ऊर्फ नाटो (पूर्ण नाव नाही, शहाबाजार) या दोघांनी घरात प्रवेश केला व सासू-सुनेला शिविगाळ केली. तुझा नवरा कोठे गेला, असे दरडावून विचारत जावेदने सासूला घराबाहेर जाण्यास सांगून फिर्यादीच्या पोटावर तलवार धरली. धमकी देऊन फिर्यादीच्या गळय़ातील सोन्याची पोत ओरबाडली. घरातील कपाटाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ६ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दुचाकीची धडक बसून जखमी
जालना रस्त्यावरील रामनगर येथे दुचाकीची धडक बसून सरदार पाटील गंभीर जखमी झाले. राजेंद्र सरदार पाटील (रामनगर, मुकुंदवाडी) यांनी याबाबत एम सिडको पोलिसात फिर्याद दिली. एमएच २० सीएन ६३३१ या क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या वडिलांना धक्का देऊन गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
लाचखोर कर्मचारी जाळ्यात
वार्ताहर, बीड  
शेतजमिनीची मूळ नक्कल देण्यास साडेचारशे रुपयांची लाच घेताना तहसीलच्या भूमी अभिलेख कक्षातील सेवानिवृत्त तलाठी बाबासाहेब बागलाने यास पकडण्यात आले. बीड तालुक्यातील देवीबाभुळगाव येथील रामदास धोंडिबा जोगदंड यांना जमिनीची फोड करण्यास शेत जमिनीच्या मूळ नकला हव्या होत्या. या साठी त्यांनी तहसील कार्यालयात संपर्क केला असता अभिलेख कक्षात काम करणाऱ्या बागलाने याने साडेचारशे रुपयांची लाच मागितली. बुधवारी लाच घेताना कार्यालयातच त्याला पकडले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली.