होळी खेळत असताना अंगावर रंग उडाल्याने झालेल्या वादावादीतून रबाळे येथील भीमनगर येथे दोन जणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. यात एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सहा जणांना रबाले एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. भीमनगरमध्ये राहणारा राजेश यादव यांचा सात वर्षांचा मुलगा सकाळी होळी खेळताना या ठिकाणी राहणारा चंदन राजभर याच्या अंगावर रंग उडाला. यामुळे संतापलेल्या चंदन याने यादव याला जाब विचारत शिवीगाळ केली. यावेळी शेजाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण मिटवले होते. मात्र दुपारी तीनच्या सुमारास पाच मित्रांसह आलेल्या चंदन याने यादव याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शेजारी राहणारा संदीप गौतम (२५) हा यादव याच्या मदतीसाठीमध्ये पडला. यात संदीपला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चंदन याच्यासह त्याच्या पाच मित्रांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवार यांनी दिली आहे.
तुभ्र्यात दोन गटांत हाणामारी; सहा जण जखमी
तुर्भे येथील शिवशक्तीनगरमध्ये सकाळी होळी खेळताना लहान मुलांमधील भांडणात त्यांच्या घरातील मोठय़ांनी सहभाग घेतल्याने झालेल्या राडय़ामध्ये सहा जण जखमी झाले असून, यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आली आहे. साखरबाई शीलवंत (६०), दीपक शीलवंत (२८), जगजीवन शीलवंत (३५), सूरज शीलवंत (१७), किरण शीलवंत (१५) आणि सचिन शीलवंत (१८) यांचा समावेश आहे. शीलवंत आणि शिंदे यांच्या मुलांमध्ये होळी खेळताना झालेल्या वादावादीतून जगजीवन शीलवंत आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये भांडण झाले. यावेळी शिंदे यांनी त्याच्या तीन साथीदारांसह जगजीवन व इतरांना मारहाण केली असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.