सिडको भागातील रोहित्रांमधून तांब्याची पट्टी चोरणाऱ्या दोघांना जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी पकडून सिडको पोलिसांच्या हवाली केले. त्यांनी १५ हजार रुपयांच्या तांब्याच्या पट्टय़ा चोरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोरलेल्या तांब्याच्या पट्टय़ा कोण खरेदी करत होते, याची माहिती सिडको पोलीस आरोपी इब्राहिम शेख याच्याकडून घेत आहेत.
सिडको येथील बळीराम पाटील शाळेजवळ वीजपुरवठा खंडित झाला होता. कोणतेही तांत्रिक बिघाड नसताना वीजपुरवठा का बंद झाला, याची तपासणी करण्यासाठी जीटीएलचे कर्मचारी ज्ञानेश्वर वाघ व बी. एच. भागवत रोहित्र तपासणीसाठी गेले. दुपारी सव्वाबारा वाजता काही व्यक्ती डीपी बंद करून तेथे काम करत असल्याचे आढळून आले. कंपनीचे कर्मचारी नसतानाही अन्यत्र कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या व्यक्तींना हटकले. पकडले जाऊ या भीतीने त्यातील एकजण पळाला. अन्य दोघांना कर्मचाऱ्यांनी पकडले. तांब्याची पट्टी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
शहरातील पिसादेवी रोड भागातील विजेचा खांब परस्पर हटवणाऱ्यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परवानगी न घेता विद्युत उपकरणे हलवली जात असल्याने जीटीएलचे अधिकारी आणि कर्मचारी हैराण आहेत.