चंद्रपूर जिल्ह्य़ातील तुकूम येथील रहिवासी विद्या वरारकर आणि वृषाली वरारकर या दोन तरुण सख्या बहिणींचे मृतदेह चंद्रपुरातील राधाकृष्ण बिग सिनेमाच्या बाजूच्या रेल्वे रूळावर कटलेल्या अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे. यापैकी विद्याचा विवाह अवघ्या दोन दिवसांनी होणार असताना ही घटना झाल्याने दोघींनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी हरिश्चंद्र वरारकर यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांच्या विद्या व वृषाली या दोन्ही मुली काल बुधवारी सायंकाळी ६.३० वाजता कामानिमित्ताने घरातून बाहेर पडल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या घरी परत आल्याच नाही. याच दरम्यान रात्री १० वाजताच्या सुमारास तुकूम येथील राधाकृष्ण बिग सिनेमा या चित्रपट गृहाच्या अगदी बाजूने जाणाऱ्या दिल्ली-मद्रास रेल्वे लाईनवर दोन मुलींचे मृतदेह कटलेल्या अवस्थेत मिळाले. या परिसरातील प्रत्यक्षदर्शीनी या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच रामनगरचे ठाणेदार मडावी यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले. या मुलींजवळ कुठल्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा काही वस्तू न मिळाल्याने अज्ञात मुलींचा रेल्वेने कटून मृत्यू झाल्याची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली.
दरम्यान मध्यरात्रीपासून पोलिसांनी मुलींची ओळख पटविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पोलीस शोध घेत असताना तिकडे हरिश्चंद्र वरारकर यांच्या दोन्ही मुली बेपत्ता होत्या. आज सकाळी जेव्हा त्यांना दोन मुलींचे मृतदेह रेल्वे रूळावर मिळाल्याचे कळले तेव्हा त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन बघितले असता त्यांच्याच दोन्ही मृलींनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांचे पदवीपर्यतचे शिक्षण झाले होते. मोठी मुलगी विद्या हिचे लग्न काही दिवसांपूर्वीच जमले आणि दोन दिवसांनी ११ मे रोजी होणार होते. रामनगर पोलिसांनी या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी घेतली असली तरी मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
रेल्वेने कटून दोघींचा मृत्यू झाला असला तरी शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण का ते सांगता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. वरारकर कुटुंब अतिशय मनमिळावू म्हणून या परिसरात ओळखले जाते. केवळ विवाहाला विलंब होत असल्याने मुलींसह घरातील सर्व मंडळी मानसिकदृष्टय़ा काहीसे त्रस्त झाले होते. मात्र विद्याचे लग्न जमल्यापासून सर्वकाही सुरळीत सुरू असताना दोघींनीही अचानक आत्महत्या का केली याचाही पोलिस तपास करीत आहेत. हा हत्येचा प्रकार आहे काय अशी विचारणा ठाणेदार मडावी यांना केली असता त्यांनी असे कुठलेही लक्षण प्रथम दर्शनी दिसत नसल्याचे सांगितले.