दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर शहरात स्वाईन फ्ल्यूचे आगमन झाल्याने आरोग्य खाते सजग झाले आहे. स्वाईन फ्ल्यू आजार असलेले दोन रुग्ण शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल असून ते अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.
गेल्या दोन महिन्यात शहरात स्वाईन फ्ल्यूचा रुग्ण आढळून आला नव्हता, त्यामुळे हा आजार आता पुन्हा येणार नाही, असे जाणवत होते. परंतु नुकतेच रामदासपेठेतील ‘क्रिम्स’ हॉस्पिटलमध्ये तीन रुग्ण दाखल झाले. त्यापैकी स्वस्थ झाल्याने एका रुग्णाला सुटी देण्यात आली. दोन रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये एक रुग्ण मुंबईचा तर दुसरा रुग्ण गोंदियाचा रहिवासी आहे. हैदराबादमध्ये एका स्वाईन फ्ल्यू रुग्णाचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण झालेले गरीब व सर्वसामान्य रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) उपचारासाठी येतात. परंतु येथे स्वाईन फ्ल्यूवरील ‘टॅमी फ्ल्यू’ हे औषध नाही. त्यामुळे या आजाराचे रुग्ण आल्यास त्यांना बाहेरून औषधी आणावी लागणार आहे. गेल्या एक वर्षांत नागपुरातील विविध रुग्णालयात उपचारादरम्यान स्वाईन फ्ल्यूने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन वर्षांत पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे आगमन झाल्याने आरोग्य खात्याची धावपळ सुरू झाली आहे.