कधी कधी चोरीच्या घटनांमध्ये अनेक गमतीशीर योगायोग पहायला मिळतात. लोअर परळ येथील चोरीच्या दोन घटनांमध्येही असेच झाले आहे. या कंपनीत दोन वेळा चोरी झाली. पहिली चोरी एप्रिल २०१२ मध्ये आणि दुसरीही एप्रिल २०१३ मध्ये. दोन्ही वेळेला चोरीची पद्धत एकसारखीच होती. दोन्ही चोऱ्या सख्ख्या भावांनी केल्या. या दोन्ही चोऱ्यांचा छडाही पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला.
 लोअर परळच्या सनमिल कंपाऊंडमधली पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मिरहा ग्रूपचे कार्यालय आहे. सोमवारी रात्री कंपनीत चोरी झाली. चोरांनी बाथरूमच्या काचा काढून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम आणि दागिन्यांची चोरी केली. ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना काही गोष्टी आढळल्या. मागील वर्षी एप्रिल महिन्यातच या कार्यालयात ३२ लाखांची चोरी झाली होती. त्यावेळीसुद्धा चोर बाथरूमच्या काचा काढून आत शिरला होता. दोन्ही गुन्ह्यांची पद्धत सारखीच होती. पोलिसांनी मग त्याचा शोध घेऊन दोन आरोपींना अटक केली. पण खरा धक्का बसला तो पुढे. गेल्या वर्षी जेव्हा या कंपनीत चोरी झाली होती तेव्हा बंटी सातर्डेकर हा आरोपी होता. रविवारी झालेल्या चोरीच्या दुसऱ्या घटनेतील मुख्य आरोपी हा याचा सातर्डेकरचा मोठा भाऊ किशोर सावर्डेकर निघाला. गेल्या वर्षी जेव्हा बंटीने चोरी केली तेव्हा पोलिसांनी त्याला लगेच अटक केली होती. त्याच्यावरील आरोपपत्राची एक पत्र त्याच्या घरी होती. ही प्रत त्याचा किशोरने पाहिली आणि त्याने आपली अक्कल लावून या चोरीची योजना बनवली.
मात्र किशोरने त्यासाठी आणखी साथीदारांना सोबत घेतले. त्यापैकी पोलिसांनी विजय गुप्ता आणि अनिल जैस्वाल याला अटक केली आहे, तर विकी कदम, अजय सोनकर आणि मुख्य आरोपी किशोर सावर्डेकर फरार आहेत. आम्ही अवघ्या १२ तासात या चोरीचा उलगडा केला असून अन्य फरार आरोपींचा शोध घेत आहोत, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर घागरे यांनी सांगितले.
घरातले दागिने कार्यालयात नेले आणि.
मिरहा कंपनीत सविता नायर काम करतात. त्यांच्या घरात पेस्ट कंट्रोलचे काम सुरू असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून घरातील जवळपास १२ तोळ्यांचे दागिने त्यांनी कार्यालयात आणून ठेवले होते. रविवारी रात्री जेव्हा चोर या कार्यालयात शिरले तेव्हा त्यांना आयतेच अलिबाबाच्या गुहेतील खजिन्याप्रमाणे हे दागिने हाती पडले. काय दुर्बुध्दी सुचली आणि दागिने ऑफिसमध्ये आणले, असे साविता नायार यांना झाले होते. पण सुदैवाने चोर सापडल्याने त्यांना दागिने परत मिळणार आहेत.