मुंबईतील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (आयआयटी) २४व्या वनमहोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या पवई येथील संकुलात तब्बल दोन हजार रोपे लावण्यात आली.
आयआयटीच्या संकुलातील केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक यांनी या वृक्षारोपणात सहभाग घेतला. गेली २४ वर्षे हा उपक्रम पवईच्या आवारात राबविण्यात येत आहे. त्यामुळे, पवईच्या सदाहरित निसर्गात दरवर्षी भरच पडते आहे.
आंबा, कडुलिंब, बांबू, कदंब, पलाश, निलगिरी आदी ४२ प्रकारची रोपे यावेळी लावण्यात आली. संस्थेच्या डोंगरी पट्टय़ात ही झाडे लावण्यात आली. आयआयटीचे उपसंचालक प्रा. एच. एस. पंडलई यांनी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. तसेच, पायाभूत सुविधा नियोजन आणि सहकार्य विभागाचे अधिष्ठाता प्रा. एन. वेंकटरामाणी, कुलसचिव डॉ. प्रेमकुमार, इंजिनिअर व्ही. बी. मामदापूर, प्रमुख सुरक्षा अधिकारी एस. एस. झा आदी पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.  केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी निसर्गावर आधारित छोटेसे नाटुकले आणि गाणे सादर केले. संस्थेच्या हॉर्टीकल्चर विभागातर्फे या रोपांची निगा राखली जाते.