तालुक्यातील अळसुदे येथे एकाच रस्त्याची महसुलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते या दोघांनी वेगवेगळी दोन भूमिपूजने केली. या कार्यक्रमांद्वारे आम्हीच रस्ते केल्याचे दावे-प्रतिदावे आता दोन्ही काँग्रेसमध्ये सुरू असून हा लोकांच्या करमणुकीचा विषय बनला आहे.
अळसुदे ते देमनवाडी या २४ लाख रूपये खर्चाच्या रस्त्याचे दोन महिन्यांपुर्वीच महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी वाजत गाजत हा कार्यक्रम करण्यात आला. दोनच दिवसांपुर्वी म्हणजे गेल्या शनिवारी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनीही रस्त्याचे भुमीपूजन केले.  
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्र फाळके म्हणाले, या कामासाठी नाशिक पॅकेजमधून निधी मिळाला असून तो जिसल्हा परिषदेने दिला. त्याच्याशी काँग्रेसचा काही संबंध नाही. थोरात यांनी कामाचे भुमीपूजन केले, त्यावेळी जिल्हा परिषदेचा संबंदीत अभियंताही गैरहजर होता, त्याविषयी महसुलमंत्र्यांनी विचारणाही केली होती. मात्र केवळ श्रेट लाटण्यासाठीच त्यांनी भुमीपूजन उरकून घेतले.   
काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांना मात्र ही गोष्ट मान्य नाही. ते म्हणाले, हा रस्ता २००९ मध्येच  सालीच झाला असता. नाशिक पॅकेजचा निधी त्यावेळीच आला होता,  तो राज्य सरकारने दिला होता. मात्र पालकमंत्र्यांनीच जिल्हाधिकारी की, जिल्हा परिषद खर्च करणार असा मुद्दा उपस्थित करून  हा निधी परत पाठवला होता. मात्र सुदैवाने तो परत आला, त्यावेळी महसुलमंत्र्यांच्या हस्ते रितसर कामाचे भुमीपूजनही झाले, त्यानंतर हा रस्ता पुर्णही झाला. असे असताना तेच विनाकारण श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.