कामचुकारपणा करणारे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता राजीव पिंपळशेंडे व चपराशी निशी चांदेकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा आयुक्त प्रकाश बोखड यांनी दिला आहे.
 महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याने शहरातील बहुतांश कामे रखडलेली आहेत. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांचा खेळखंडोबा झालेला आहे. रस्ते, नाली बांधकाम, स्वच्छतेची कामे थंडबस्त्यात आहेत. त्यामुळे शहरातील लोकांनी आता ओरड सुरू केलेली आहे. त्यामुळे आयुक्तांनी कडक भूमिका घेतली असून कामचुकारपणा करणाऱ्या कनिष्ठ अभियंता राजीव पिंपळशेंडे व चपराशी निशी चांदेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. शहरात महापालिकेच्या अनेक मोकळय़ा जागा आहेत. शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता वेकोलिने मोकळय़ा जागांवर वृक्षारोपण करण्याची योजना महापालिकेला दिली होती. या योजनेंतर्गत मोकळय़ा जागेवर वृक्षारोपणाचा संपूर्ण खर्च व तीन वर्षांपर्यंत त्याची देखभाल करण्याची जबाबदारी वेकोलिने घेण्याची तयारी दाखविली. त्यानुसार वेकोलिने महापालिकेला तसा प्रस्तावही सादर केला. या प्रस्तावानुसार आयुक्त प्रकाश बोखड यांनी कनिष्ठ अभियंता पिंपळशेंडे यांना अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले, मात्र तीन महिन्यापासून ते तयारच केलेले नाही. वेकोलिने वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही महापालिकेने अंदाजपत्रक तयार केले नाही, हे बघून वेकोलिने शेवटी ही योजनाच रद्द करत असल्याचे पालिकेला कळविले.
आयुक्त बोखड यांना याची माहिती मिळताच आज त्यांनी कामचुकारपणा करणारे कनिष्ठ अभियंता राजीव पिंपळशेंडे यांना तडकाफडकी निलंबित केले. विशेष म्हणजे, बोखड गेल्या तीन महिन्यापासून पिंपळशेंडे यांच्या मागे अंदाजपत्रक तयार करा म्हणून लागले होते. महापालिकेच्या आमसभेतही हा विषय चर्चेला आला होता. तीन वेळा स्मरणपत्रे दिल्यानंतरही पिंपळशेंडे काम करत नाहीत, हे बघून आयुक्तांनी ही कारवाई केली, तर चपराशी निशी चांदेकर सुटी न टाकता कित्येक महिन्यांपासून गैरहजर असल्याने त्यांनाही निलंबित केले आहे. स्थायी समिती सभापती नंदू नागरकर यांच्या कक्षावर चांदेकर होते. नागरकर यांनी सभापतीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून ते गैरहजर आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय बराच गाजला तेव्हा उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी ५० कर्मचारी गैरहजर आहेत तेव्हा सर्वाना निलंबित करा, असा मुद्दा लावून धरला होता. तेव्हा सर्व नगरसेवकांनी देवतळे यांना चांगलेच धारेवर धरले होते. कामातील कामचुकारपणा लक्षात घेता आयुक्तांनी या दोघांवरही कारवाई केली आहे. या कारवाईने पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. भविष्यात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर याच पध्दतीने कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त प्रकाश बोखड यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.