महाविद्यालयाने घेतलेल्या बारावीच्या पूर्वपरीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून बेलापूर येथील शुभांगी प्रभाकर आढाव (वय १९) या विद्यार्थिनीने रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. तर सहलीला जायला पैसे दिले नाही म्हणून धनगरवाडी येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या राणी रमेश सातव (वय १६) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या दोन घटनांमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
नगर शहरात भिंगार येथे मंगळवारी वेगवेगळय़ा दोन घटनांमध्ये दोघा मुलांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. त्यानंतर लगेचच श्रीरामपूर येथेही अशीच घडल्याने शाळकरी मुलांच्या या मानसिकतेबद्दल जिल्हय़ात चिंता व्यक्त होत आहे.
शुभांगी हिचे वडील प्रभाकर आढाव हे नारायणगाव येथे नोकरी करतात. मुळाप्रवरा वीज संस्थेतील अभियंता रामदास आढाव हे तिचे चुलते असून, इयत्ता तिसरीपासून ती त्यांच्याकडे शिकायला होती. शुभांगी ही बेलापूर येथील जेटीएस विद्यालयात बारावी शास्त्र शाखेत शिकत होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. विद्यालयाने घेतलेल्या पूर्वपरीक्षेत तिला कमी गुण मिळाले. त्यामुळे ती नाराज होती. आढाव हे शिक्षक कॉलनीत राहतात. दोघे पती-पत्नी काल फिरायला बाहेर गेले असताना शुभांगी एकटीच घरी होती. तिने नैराश्यातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आजूबाजूच्या लोकांनी तिला विझवून साखर कामगार रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना गुरुवारी तिचा मृत्यू झाला. तिच्यामागे आईवडील, एक भाऊ असा परिवार आहे.
धनगरवाडी येथील राणी रमेश सातव (वय १६) या दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने सहलीला जायला पैसे दिले नाही म्हणून विष घेऊन आत्महत्या केली. राणी ही वाकडी येथील लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होती. तिची सहल दि. १८ रोजी जाणार होती. त्यासाठी तिला १ हजार ८०० रुपये हवे होते. अडचणीमुळे आईवडिलांना पैसे देता आले नाही. नाराज झालेल्या राणीने आईवडील शेतात गेल्यानंतर पिकावर फवारण्याचे विषारी औषध घेतले. तिचा भाऊ दत्तात्रय (वय १४) याने ही माहिती घरच्यांना दिली. साईनाथ रुग्णालयात तिला औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच बुधवारी तिचा मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.