महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणात न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर अखेर आज अॅड. उदयसिंह पाटील यांना अटक झाली. ज्येष्ठ आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे ते पुत्र असल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, अॅड. उदयसिंह पाटील यांच्या अटकेच्या पाश्र्वभूमीवर कराड शहर परिसरासह तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. खबरदारी म्हणून या खून खटल्यातील प्रमुख संशयित सलिम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यासह अन्य काही जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.
अॅड. उदयसिंह पाटील यांनी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयात केलेल्या अटकपूर्व जामीनअर्जावर गेल्या दोन दिवसांत जोरदार युक्तिवाद झाले. त्यात कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाची २०१४ ची निवडणूक डोळय़ासमोर ठेवून या प्रकरणात अॅड. उदयसिंह पाटील यांना गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा युक्तिवाद अॅड. डी. व्ही. पाटील यांनी केला. तर सरकारी यंत्रणेकडूनच अॅड. उदयसिंह पाटील यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच पुढील तपासासाठी त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी अशी मागणी सरकार पक्षातर्फे अॅड. विकास पाटील-शिरगावकर यांनी केली. या वेळी जादा तपासी अधिकारी अमोल तांबे यांनीही न्यायालयात पोलिसांतर्फे बाजू मांडली. यानंतर आज तिसऱ्या दिवशी न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळला. यावर अॅड. डी. व्ही. पाटील यांनी लगेचच उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत मागणारा अर्ज सादर केला. न्यायालयाने तोही अर्ज फेटाळला. यानंतर पोलिसांनी अॅड. उदयसिंह पाटील यांना ताब्यात घेतले.
अॅड. पाटील यांच्या जामीनअर्जावर काल अखेर बचाव व सरकार पक्षाचे युक्तिवाद पुर्ण झाल्यानंतर जामीनअर्जाच्या निकालाबाबत लोकांची उत्सुकता ताणली होती. या पाश्र्वभूमीवर सातारा जिल्हा न्यायालय परिसरात आज चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर अॅड. उदयसिंह पाटील न्यायालयात आले. न्यायालयाने पाटील यांचा जामीन फेटाळल्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर बचाव पक्षाचे वकील अॅड. डी. व्ही. पाटील यांनी लगेचच उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुदत मागणारा अर्ज सादर केला. त्यावरही बचाव पक्ष व सरकार पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद झाले. यानंतर न्यायालयाने तोही अर्ज फेटाळला. पाठोपाठ पोलिसांनी उदयसिंह पाटील यांना ताब्यात घेतले.
गेल्या चार वर्षांपूर्वी कराडनजीकच्या मलकापूर येथे महाराष्ट्र केसरी मल्ल संजय तुकाराम पाटील-आटकेकर यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर आहे. तर, सध्या या गुन्ह्याचा जादा तपास अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे हे करीत आहेत. दरम्यान, या खून प्रकरणी पोलिसांनी २२ जानेवारी २०१३ रोजी शंकर वसंत शेवाळे यास अटक करून न्यायालयासमोर हजर करतेवेळी सादर केलेल्या रिमांड यादीमध्ये अकरा नंबरचा आरोपी म्हणून उदयसिंह पाटील यांच्या नावाचा समावेश झाला होता. यापूर्वी या खून प्रकरणी पोलिसांनी कुख्यात गुंड सलिम शेख ऊर्फ सल्या चेप्या, सागर परमार, लाजम होडेकर, बाबा मोरे, संभाजी पाटील, हमीद शेख आदी दहा जणांना अटक केली आहे.
अॅड. उदयसिंह पाटील यांचा जामीन फेटाळल्यानंतर सरकारी वकील अॅड. विकास पाटील-शिरगावकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की मोठय़ा व्यक्तींनी गुन्हे केले तर त्यांना काहीही होत नाही असा समाजाचा समज झाला आहे. हा समज या निर्णयाने खोटा ठरविला आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत हेच या निर्णयाने दाखवून दिले आहे. कायदा व पोलीस यंत्रणा यांच्यावरील जनतेचा विश्वास या निर्णयाने दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2013 8:49 am