गेली १७ वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या शिवसेनेला या वर्षी नवी मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करावयाची असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने हा विषय आता संपलेला असून थोडय़ाच दिवसांत नवीन जिल्हाप्रमुखाची नियुक्ती केली जाणार असल्याचे संकेतदेखील त्यांनी या वेळी दिले.
नवी मुंबई पालिका निवडणुकीला आता केवळ तीन महिने शिल्लक राहिले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी चार उपजिल्हाप्रमुख, दोन शहरप्रमुख, बारा उपशहरप्रमुख आणि एक महिला संघटक यांची बैठक मातोश्रीवर घेतली. या वेळी पालिकेवर कोणत्याही स्थितीत भगवा फडकविण्याचे आवाहन त्यांनी या पदाधिकाऱ्यांना केले. चौगुले यांनी राजीनामा दिल्याने पक्षाकडे आता तेवढय़ा ताकदीचा नेता शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन एक आठवडा उलटला तरी त्यांचा उत्तराधिकारी नेमण्यात आलेला नाही.  या वेळची निवडणूक पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली लढली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पक्षनेतृत्व जो जिल्हाप्रमुख देईल त्याच्या नेतृत्वाखाली ह्य़ा निवडणुका लढविल्या जातील, असे शब्दबंधन या वेळी देण्यात आले. शिवसेनेचे सध्या पालिकेत १७ नगरसेवक आहेत. ही संख्या ५५ पर्यंत नेण्याची जबाबदारी या नेतृत्वाची आहे. राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक शिवसेनेत येण्याच्या तयारीत आहेत.