शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आषाढी वारीचे आकाशातून घेतलेल्या छायाचित्रांचा नयनरम्य आविष्कार रविवारपासून करवीरकरांसाठी खुला झाला आहे. ‘पहावा विठ्ठल’ या नांवाचे छायाचित्रांचे प्रदर्शन शाहू स्मारक भवनातील कलादालनात रविवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरूण दुधवाडकर यांच्या हस्ते झाले.प्रदर्शनात ७२ छायाचित्रांचा समावेश असून ते २० जुलैपर्यंत खुले राहणार आहे.
या वेळी दुधवाडकर म्हणाले, महाराष्ट्राला सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक अशी थोर परंपरा आहे. या परंपरेत आषाढी वारीचे महत्व अनन्यसाधारण आहे. या वारीनिमित्त गावोगावातून निघणाऱ्या दिंडय़ा एकत्र येतात. वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. त्यातून होणारा रिंगण सोहळा, दिवे घाटातून जाणारी पालखी,माऊलीची पालखी याची उध्दव ठाकरे यांनी अवकाशातून छायाचित्रे घेतली आहेत. ती या प्रदर्शनात सादर केल्याने या माध्यमातून रसिकांना प्रती पंढरपूरचे दर्शन घडणार आहे.    संयोजक जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी स्वागत केले. आषाढी एकादशी दिवशी (१९ जुलै) प्रदर्शनस्थळी दिवसभर खिचडी वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, महिला आघाडी अध्यक्षा शुभांगी साळोखे, जि.प.सदस्य बाजीरावपाटील, एस.आर.पाटील, पं.स.सदस्य तानाजी आंग्रे, सरदार पिसाळ, टी.एस.पाटील, हर्षल सुर्वे, संदीप पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.