पुणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्व धरणे तुडुंब भरली असताना त्याठिकाणी संततधार पावसामुळे बंडगार्डन येथून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग किंचित कमी झाला असला तरी त्यामुळे उजनी धरण झपाटय़ाने भरत चालले आहे. शनिवारी सायंकाळी धरणात ८३.७५ टक्के इतका पाणीसाठा होता. येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मागील दोन वर्षे बंद असलेला या धरणावरील १३ मेगॉवाट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे.
येत्या दोन दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरण्याचा अंदाज विचारात घेऊन धरणातून अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने हाती घेतली आहे. त्यामुळे पंढरपुरात नजीकच्या काळात पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात पाण्याची पातळी ४९६.०७२ मीटर इतकी होती तर एकूण पाणीसाठा ३०७३.५० दशलक्ष घनमीटर व उपयुक्त पाणीसाठा १२७०.६९ दलघमी होता. म्हणजे उपयुक्त पाण्याचा साठा ८३.७५ टक्के इतका होता. धरणातून दोन्ही कालव्यांवाटे पाणी सोडण्यात येत असून सायंकाळी या पाण्याचा विसर्ग २८०० क्युसेक्स होता. तर बोगद्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग ९५० क्युसेक्स होता. धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग काल शुक्रवारी ७३ हजार ६३५ क्युसेक्स इतका होता. परंतु शनिवारी सायंकाळी तो कमी होऊन ६७ हजार  ८०४ क्युसेक्सपर्यंत झाला, तर बंडगार्डन येथून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग ५२ हजार ६३८ क्युसेक्सवरून कमी करून १६०० क्युसेक्स इतका होता.
सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पिकांसह जीवित व वित्तहानीचा मोठा फटका;
कोयनाचे दरवाजे ६ फुटांवर जैसे थे
वार्ताहर, कराड
दिवसाची ओढ तर रात्रीचा जोर अशी पावसाची तऱ्हा कायम असून, आज दिवसभरात घेतलेल्या उघडिपीमुळे कोयना धरणातील पाण्याची आवक घटली असून, पाणीसाठाही अंशत: कमी झाला आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शेतीपिकांसह जीवित व वित्तहानीचाही फटका बसला आहे. संगमनगर धक्का पुलासह कमी उंचीचे साकव व फरशी पूल पाण्याखाली जाऊन सुमारे ७२ गावे व वाडय़ावस्त्यांचा संपर्क तुटलेलाच आहे. तर, सर्वच लहान-मोठे बंधारे भरभरून वाहत आहेत.  
पावसाळय़ातील नुकसानीचा आढावा घेता, बक्कळ पावसाबरोबर बक्कळ असे नुकसान झाल्याचे चित्र आहे. हातगेघर येथे नीशा उत्तम कांबळे ही १३ वर्षीय शाळकरी मुलगी पुरात वाहून गेली आहे. तर, स्वाइन फ्ल्यूने सातारा जिल्ह्यात चार बळी घेतले असून, अनेक जण या भयानक साथीने त्रस्त आहेत. परिणामी लोकांमध्ये सुप्त भीतीचे वातावरण आहे. कास-बामणोलीसह नजीकच्या विभागात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असून, अतिवृष्टी व थंडीमुळे दगावलेल्या गाई, म्हशी, शेळय़ा अशा पशुधनांची संख्या पाचशेवर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाटण तालुक्यातील चाफेर परिसरातील १४ म्हशी कोयना नदीतून वाहून गेल्या आहेत. कोयना परिसरासह दुर्गम डोंगराळ भागात बहुतांश ठिकाणी विजेचा खेळखंडोबा झाला आहे. याचबरोबर ठिकठिकाणी सखल भागातील शेतात पाणी साचून शेतकरी वर्गाचेही मोठे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. एकंदर नुकसानीची आकडेवारी कोटीच्या घरात पोहचली आहे.  
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात १८० एकूण ४,४३२, महाबळेश्वर विभागात ८३ एकूण ४,७३७ तर नवजा विभागात १६२ सर्वाधिक ५,११२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात धरणक्षेत्रात सरासरी केवळ १० मि.मी. पावसाची नोंद आहे. सध्या धरणाचा पाणीपातळी २,१५४ फूट १० इंच असून पाणीसाठा ९४.०८ म्हणजेच ८९.४० टक्के आहे.
कोयना जलाशयात ३२ हजार क्युसेक पाण्याची आवक होताना, ६ फुटांपर्यंत उचललेल्या ६ वक्र दरवाजातून ३५,३४१ क्सुसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. चालू हंगामात आजवर धरणात ११९ टीएमसी म्हणजेच धरणाच्या क्षमतेच्या तुलनेत ११३ टक्के पाण्याची आवक झाली असून, वीजनिर्मितीसह दरवाजातून ५५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. कोयना धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठावर आज पावसाची उघडीप राहिली. आजवर कराड तालुक्यात सरासरी ४१५ तर, पाटण तालुक्यात १३६५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यात सरासरी ७२६.२ मि.मी पाऊस झाल्याची आकडेवारी प्रशासनाने प्रसिद्धीस दिली आहे. त्यात नवजा विभागात सर्वाधिक ५,११२ तर, सर्वात कमी माण तालुक्यात १२४.३ मि.मी. पावसाची नोंद आहे.
नीरेमुळे माळशिरस तालुक्यात पूरजन्य परिस्थिती
प्रतिनिधी, सोलापूर
देवधर, भाटघर आणि वीर ही धरणे पूर्णत: भरल्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत हजारो क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अकलूज येथे ग्रामदैवत अकलाई देवी मंदिराजवळचा बंधारा पाण्याखाली गेला आहे.
पुणे व सातारा जिल्ह्य़ात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे तेथील धरणे पूर्णपणे भरली आहेत. त्यामुळे अतिरिक्त झालेले पाणी गेल्या आठवडय़ापासून नीरा नदीत सोडले जात आहे. वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग ४७ हजारांपर्यंत होता. वीर धरणातून सिंचनासाठी नीरा उजवा व डाव्या कालव्यालाही पाणी सोडण्यात आले आहे. दोन्ही कालवे खळाळून वाहत आहेत. मात्र एरव्ही अवर्षणप्रवण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्यात यंदा सुदैवाने वरुणराजाने कृपादृष्टी केल्यामुळे या भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी नीरा उजवा व डाव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी सिंचनासाठी घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे निमगाव, फोंडशिरस, उघडेवाडी या भागातील तलाव भरण्यासाठी दोन्ही कालव्यांचे पाणी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, उजनीच्या बेगमपूर कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे कालवा फुटल्याने त्याभागातील अनेक शेतक ऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. हे पाणी मोहोळ तालुक्यातील वाघोली, सारोळे, वटवटे, जामगाव व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीमार्गे निंबर्गीपर्यंत पोहोचणार होते. परंतु अचानकपणे अंत्रोळीजवळ कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी आसपासच्या शेतामध्ये घुसले. यात पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. कालवा फुटल्याने जलसंपदा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून हे काम चार दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.