दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी धरणातील पाण्याचा साठा वजा पन्नास टक्क्य़ांपर्यंत प्रचंड खालावला आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात वेळेवर पाऊस झाला तरच या धरणात पाणी साठवता येऊ शकेल. अन्यथा जुलैपर्यंत पावसाचा पत्ता न लागल्यास जिल्ह्य़ातील दुष्काळी परिस्थिती आणखी भीषण ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
उजनी धरणातील पाणी वाटपाचे नियोजन साफ चुकल्यामुळे ही संकटाची परिस्थिती उद्भवली आहे. धरणाच्या इतिहासात प्रथमच वजा पन्नास टक्क्य़ापर्यंत प्रथमच पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे हा चिंतेचा विषय बनला आहे. प्राप्त परिस्थिीत उजनी धरणात पुणे जिल्ह्य़ातून पाणी सोडण्याची मागणी करूनदेखील त्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साफ दुर्लक्ष केल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाला तसा आदेश देणे भाग पडले होते. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्य़ातून गेल्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात चार टीएमसी पाणी सोडण्यात आले असले तरी हा पाण्याचा प्रवाह अतिशय मंद राहिल्याने हे पाणी प्रत्यक्षात उजनी धरणात पोहोचू शकले नाही. उलट या पाण्याचा लाभ पुणे जिल्ह्य़ातच घेतला गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे  सोलापूर जिल्ह्य़ाच्या नावाने सोडलेल्या पाण्याचा लाभ या जिल्ह्य़ाला मिळाला नाही, ही वस्तुस्थिती आता उघड झाली आहे.
उजनी धरणात सध्या केवळ मृतसाठय़ातील ३७.८३ टीएमसी एवढाच पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यातदेखील सुमारे १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ राहिला आहे. म्हणजे धरणात केवळ २२ टीएमसी एवढाच पाणीसाठा असल्याची शक्यता आहे. या धरणाची पाण्याची क्षमता ११७ टीएमसी एवढी असून त्यापैकी जिवंत पाण्याचा साठा ५३.५८ टीएमसी व मृत साठा ६३.६७ टीएमसी एवढा आहे. मात्र या मृत पाण्याचा साठाही निम्म्यावर संपत आल्याने धरणाची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू झाली आहे.