सोलापूर जिल्हय़ातील दुष्काळाची स्थिती गंभीर बनत असताना पुणे जिल्हय़ातून पाणी न सोडता उलट, सोलापूरच्या उजनी धरणातील उरलेसुरले पाणी बारामतीतील उद्योगांसाठी पळवले जात असल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी शुक्रवारी दुपारी येथील उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. या वेळी कार्यालयाची तोडफोड झाली. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. याप्रकरणी २२ शिवसैनिकांना अटक करण्यात आली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील व शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सेनेचे माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार यांच्यासह महापालिका सेना गटनेते भीमाशंकर म्हेत्रे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, विष्णू कारमपुरी, सदाशिव येलुरे आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. दरम्यान, दुपारी उशिरा या सर्वाना अटक करून मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता सर्वाना जामिनावर मुक्त करण्याचा आदेश देण्यात आला.
बारामती येतील डायनॅमिक्स डेअरी प्रकल्पासाठी उजनी धरणातील पाणी देण्याचा घाट घातला जात असून त्याबाबतचा ठराव बारामती नगरपालिकेने मंजूर केल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुख ठोंगे-पाटील यांचा आरोप आहे. बारामती व दौंड येथील एमआयडीसीला दिले जाणारे उजनी धरणातील पाणी तातडीने बंद करण्यात यावे, अशी शिवसैनिकांची मागणी आहे. या प्रश्नावर दुपारी शिवसैनिकांनी उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयास धडक मारली. त्या वेळी संतप्त शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालय डोक्यावर घेतले. यात तेथील फर्निचर व साहित्याचे नुकसान झाले. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलक शिवसैनिकांना बळाचा वापर करून ताब्यात घेतले.