बहुराज्यीय दर्जा प्राप्त झालेली आणि सुमारे पावणे दोन लाखहून अधिक सभासद असणाऱ्या येथील येथील नाशिक र्मचट्स मल्टिस्टेट सहकारी बँकेचे अध्यक्ष हुकुमचंद बागमार व संचालक मंडळाने बँकेचा कारभार चालविताना केलेल्या अनियमिततांची गंभीर दखल घेत रिझव्र्ह बँकेने सोमवारी या बँकेवर प्रशासकाची नेमणूक केली. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असून सभासद व खातेदारांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आवाहन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि कर्मचारी संघटनेने केले आहे. बागमार यांनी अनेक गैरव्यवहार केल्याचे आक्षेप र्मचट बँकेच्या कर्मचारी संघटनेने आधीच नोंदविले होते. त्याची चौकशी करून रिझव्र्ह बँकेने ही कारवाई केल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले असले तरी व्यवस्थापकीय संचालकांनी मात्र व्यवस्थापकीय प्रक्रियेत बदल घडविण्यासाठी ही तात्पुरती कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे.
शहरातील व्यापारी व उद्योजकांसाठी स्थापन झालेल्या नाशिक र्मचट्स बँकेच्या ७५ शाखा कार्यरत असून पावणे दोन लाख सभासद आहेत. लाखो खातेदार आहेत. बँकेचा संपूर्ण कारभार हुकुमचंद बागमार यांच्याकडे एकवटल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेने राज्य शासन व रिझव्र्ह बँकेकडे तक्रारी केल्या होत्या. या घडामोडीत बँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू असताना सोमवारी रिझव्र्ह बँकेचा फतवा आला आणि सत्ताधारी बागमार गटात एकच खळबळ उडाली. जे. बी. भोरिया यांनी नाशिक र्मचट्स बँकेचे प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतला. बँकेच्या व्यवस्थापकीय कार्यप्रणालीत रिझव्र्ह बँकेला काही दोष आढळून आले आहेत. त्यामुळे रिझव्र्ह बँकेने तात्पुरत्या काळासाठी संचालक मंडळास कामकाजास प्रतिबंध केला असल्याचे व्यवस्थापकीय संचालक भास्कर शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. व्यवस्थापकीय प्रणालीतील दोष दूर करण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. रिझव्र्ह बँकेने नाशिक र्मचट्स बँकेवर कोणतेही आर्थिक र्निबध लादलेले नाहीत. त्यामुळे सभासद व खातेदारांनी घाबरुन जावू नये असे आवाहन शिंदे यांनी केले. बँकेचे अध्यक्ष हुकुमचंद बागमार यांच्या गैरकारभारामुळे ही कारवाई झाल्याचे कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विलास आंधळे व उपाध्यक्ष मधुकर हिंगमिरे यांनी म्हटले आहे. बागमारांनी आपल्या कुटुंबियांना आर्थिक फायदा होण्यासाठी बँकेचा गैरवापर केला, गैरव्यवहार केले, असा आरोप संघटनेने केला आहे. बागमारांच्या नियमबाह्य कामांना संचालक मंडळाने मूक संमती देऊन साथ दिली. साखर घोटाळा, चुकीची माहिती देऊन रिझव्र्ह बँकेची दिशाभूल करणे, नातेवाईक व हितसंबंधियांना नियमबाह्यपणे कर्ज वाटप करणे, कर्ज देण्याच्या मोबदल्यात आर्थिक लाभ करवून घेणे, रोख रक्कम भरून राजेंद्र बागमार यांच्या नावे ‘डिमांड ड्राफ्ट’ काढणे (काळा पैसा पांढरा करणे), कर्करोग रुग्णालयाला देणगी देणे, नातेवाईकांची खोटी कागदपत्रे तयार करणे आदी नियमबाह्य कामांमध्ये हुकुमचंद बागमार यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याबद्दल वारंवार तक्रार दिल्यानंतर रिझव्र्ह बँकेने कामकाजाची तपासणी केली होती. त्यात तथ्य आढळून आल्यावर संचालक मंडळाला दूर करण्यात आल्याचे हिंगमिरे यांनी सांगितले.