29 November 2020

News Flash

वर्ल्ड व्हिजनच्या दूरदृष्टीने उमरेडच्या शाळांचा कायापालट

उघडे प्रवेशद्वार, अस्वच्छ वर्गखोल्या, तुटलेली बाके, फळ्याची दुरवस्था, पाण्याची चणचण.. गावखेडय़ांमधील शाळांचे हे सर्वसाधारण चित्र.. ही विदारक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’ने केला असून

| April 27, 2013 03:12 am

उघडे प्रवेशद्वार, अस्वच्छ वर्गखोल्या, तुटलेली बाके, फळ्याची दुरवस्था, पाण्याची चणचण.. गावखेडय़ांमधील शाळांचे हे सर्वसाधारण चित्र.. ही विदारक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न ‘वर्ल्ड व्हिजन इंडिया’ने केला असून उमरेड तालुक्यातील ५० खेडय़ांमधील शिक्षण सुविधांचे चित्र बदलण्यासाठी ‘माझी शाळा’ आणि ‘स्कूल चले हम’ या उपक्रमांच्या माध्यमातून नवी दिशा दाखविली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर शाळा-शाळांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’वर भर दिला जात असून त्यापासून पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा निचरा होऊ शकेल शिवाय उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईची समस्या उद्भवणार नाही, असा उद्देश आहे. असा उपक्रम ग्रामीण भागातील शाळांमध्ये पहिल्यांदाच राबविला जात आहे.
शिक्षणहक्क चळवळीतील हा मैलाचा दगड ठरू शकेल.. उमरेड परिसरातील एकूण आठ शाळांमध्ये माझी शाळाच्या निमित्ताने शाळांची दुरवस्था दूर करण्यात आली असून या शाळांना चकाचक स्वरुप प्राप्त झाले आहे.. टेकलावाडची, उटी, खापरी, वदाद, वेलसाखरा, हेवती, दावहा, खैरीबुटी येथील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांना याचा लाभ मिळाला आहे. या शाळांमधील उपस्थिती वाढविण्यासाठी यामुळे हातभार लागला असून ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार शिक्षणाची आवडही निर्माण झाली आहे. एनडीटीव्ही, कोकाकोला आणि वर्ल्ड व्हिजन यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. एकूण १०० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा ध्यास घेण्यात आला असून त्यापैकी आठ सरकारी शाळा उमरेडच्या आहेत, हे विशेष.
मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी भक्कम प्रवेशद्वारे हा महत्त्वाचा मुद्दा असून याला प्राधान्य दिल्यानंतर अन्य सुविधांकडे लक्ष पुरविण्यात आले. चांगल्या आणि मुक्त वातावरणात मुलांना शिक्षणाचा लाभ घेता येणे शक्य व्हावे यासाठी वर्ल्ड व्हिजनने पावले उचलली आहेत. शाळांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छता अभियान, निसर्गरम्य वातावरणासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी पाळणे-घसरगुंडी, व्यायामाची उपकरणे यामुळे खेडय़ातील मुलांनाही चांगल्या सुविधा मिळाल्या आहेत. प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह, पाण्याची सोय आणि दरवाजे असावेत, यासाठी वर्ल्ड व्हिजनने प्रयत्न केल्याने शाळांची स्थिती सुधारली आहे. त्यामुळे खाजगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांचा दर्जादेखील उंचावण्यास मदत झाली आहे.
नवीन प्रवेशद्वारे, दरवाजे, रेन हार्वेस्टिंगची सोय, स्वच्छ स्वच्छतागृहे यामुळे शाळांचे प्राथमिक स्वरुप अतिशय देखणे झाले आहे. एकूण आठ शाळांमधील ४६५ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. सातव्या वर्गात शिकणाऱ्या रक्षक या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्याने शुद्ध पिण्याचे पाणी मिळू लागल्याचे सांगितले. यापूर्वी मुलांना नळाच्या पाईपमधून येणारे पाणी प्यावे लागत होते. या परिस्थितीत आता बदल झाला आहे. वर्ल्ड व्हिजनने पाण्याच्या सुविधांकडे लक्ष पुरविले असून पाण्याची चाचणी करण्याची मोहीम राबवली. आता मुलांसाठी लोह, नायट्रेट आणि टीडीएस युक्त शुद्ध पाणी उपलब्ध होत आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) सोमेश्वर नेताम, नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती वंदना पाल, गटविकास अधिकारी अरुण निंबाळकर, उमरेड पंचायत समितीचे सभापती राजकुमार लोखंडे, रोटरी क्लब ३०३० चे गव्हर्नर संजय मेश्राम, वर्ल्ड व्हिजन इंडियाचे फ्रँकलिन जोसेफ, कोकाकोलाच्या सुपेरियर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अशोक मिश्रा, नरेन सिंग यांचे यासाठी सहकार्य लाभले. रोटरी क्लबने रोटरी दूरशिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून ४ उच्च प्राथमिक शाळांना संगणक, एलसीडी, ऑडिओ सिस्टिम देणगीदाखल दिली आहे. पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांना संगणक हाताळणे सोपे व्हावे आणि याद्वारे त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण घ्यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी जो जॉन जॉर्ज यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:12 am

Web Title: umred schools renewed by world vision
Next Stories
1 ‘शारदा’च्या धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्य़ातही चिटफंडचा कोटय़वधीचा व्यवसाय
2 गोंदिया जिल्हयातील वाघांच्या संख्येत घट
3 दगडांनी ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघे ताब्यात
Just Now!
X