शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांनी मारवाडी समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ दिग्रस, पुसद आणि इतर अनेक ठिकाणी  मारवाडी समाजबांधवांनी मोर्चे काढले, तसेच मारवाडी समाजाने सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. एक निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत खासदार अडसूळ यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे मारवाडी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. देशाच्या व राज्याच्या विकासात मारवाडी समाजाचा सिंहाचा वाटा आहे, मात्र अडसूळ यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी समाजाबद्दल अपशब्द वापरले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी स्थानिक शिवाजी चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष विजय बंग यांनी केले. काळ्या फिती लावून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
भारतीय जैन संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप मेहता, माजी नगराध्यक्ष विजय बंग, सुभाषचंद्र अटल, नंदकिशोर रोडा, अ‍ॅड. राजेंद्र कोठारी, श्याम भट्टड, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष अजय बाजोरिया यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर दिग्रसचे तहसीलदार रामकृष्ण चिरडे यांना निवेदन देण्यात आले. दिग्रस शहरातील मारवाडी समाजाची व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. मोर्चात अशोक अटल, अजय बंग, राजेश अग्रवाल, हनुमान रामावत, अजय मोदानी, शिव गौतम, रमेश करवा, किशार साबू, दीपक कोठारी यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.  
 उमरखेड येथे राजस्थानी समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. प्रतिष्ठाने बंद ठेवून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी ओमप्रकाश सारडा, नारायणदास भट्टड, नितीन भुतडा, सतीश बंग, नंदकिशोर अग्रवाल, विनोद सारडा, तुकाराम वर्मा, बालाजी लढ्ढा, राजू भंडारी, अजय अग्रवाल, अ‍ॅड विकास बाहेती, अजय माहेश्वरी, डॉ. संजय तेला यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते. पुसद येथे गिरीश अग्रवाल, डॉ.विजय जाजू, अ‍ॅड. विनोद पनपालिया, अखिलेश अग्रवाल, संजय भंडारी, अजय पुरोहित, महेश बजाज, प्रा.टी.एन. बूब, अजय पुरोहित, धनजंय सोनी इत्यादी नेत्यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
खा. आनंदराव अडसूळ उवाच
स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्यास विधिमंडळाच्या मागच्या दारातून आलेले परप्रांतातील साटेलोटे घेऊन आलेले मारवाडी-फारवाडी हेच मुख्यमंत्री होतील आणि मारवाडय़ांचे राज्य येथील मराठी माणसाला न्याय मिळणार नाही म्हणून विदर्भ नको, असे वार्ताहरांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात खासदार अडसूळ यांनी सांगितले होते. अडीच कोटी रुपये खर्च करून विधान परिषदेत आमदार आणि पाच कोटी खर्च करून राज्यसभेत खासदार होणाऱ्यांच्या हाती सत्ता जाईल, असे अडसूळ यांनी म्हटले होते. खासदार अडसूळ यांनी मारवाडी शब्दप्रयोग केला नव्हता. वार्ताहरांनी अडसूळ यांच्या विधानाचा विपर्यास केला, असे खुलासा करणारे पत्रक सेना आमदार संजय राठोड यांनी प्रसिद्ध केले आहे. खासदार अडसूळ यांच्या यवतमाळातील शासकीय विश्रामभवनात झालेल्या वार्ताहर परिषदेला आमदार संजय राठोड, खासदार भावना गवळी, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार आदी उपस्थित होते.