ठाण्यातील मुलुंड चेक नाका परिसरातील लक्ष्मी रेसिडेंसी गृह संकुलासमोर अनधिकृतपणे होणारे ट्रक पार्किंग येथील रहिवाशांची डोकेदुखी बनली असून वाहतूक विभाग तसेच शहरातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून कोणतीच मदत मिळत नसल्याने रहिवाशी अक्षरश हैराण झाले आहेत.
मुलुंड चेकनाका येथे लक्ष्मी रेसिडेंसी गृहसंकुलासमोर असलेल्या रस्त्यावर हरीष ट्रान्सपोर्ट कंपनीकडून ट्रकचे अनधिकृतपणे नो पार्किंगचे फलक असतानाही पार्किंग केले जाते. हे पार्किंग करताना इमारतीच्या प्रवेशद्वारासमोरच हे ट्रक उभे केले जातात. यामुळे अनेक वेळा इमारतीतून आपले वाहन घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या अनधिकृत पार्किंगमुळे या भागात अपघाताचा धोकाही वाढला आहे. या पार्किंगमुळे वसाहतीतून बाहेर पडताना रहिवाशांचा विरुद्ध दिशेने येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघातही घडले आहेत, असे वसाहतीमधील रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पाटील तसेच उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्याकडे अनेक वेळा तक्रार करूनही या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या जात आहेत.
याचप्रमाणे ठाण्याचे आमदार, खासदार तसेच स्थानिक नगरसेवक यांना तक्रार करूनही आजपर्यंत रहिवाशांना फक्त आश्वासनेच मिळाली असल्याचे वसाहतींमधील रहिवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या भागात इतर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांवर नेहमीच कारवाई केली जाते. परंतु वसाहतीसमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकवर कोणतीही कारवाई केली जात नाही.
वाहतूक विभागाकडून नागरिकांच्या या समस्येची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करत         आहेत.
वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने कंटाळलेल्या रहिवाशांनी थेट ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांना तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. रघुवंशी यांच्याकडून तरी न्याय मिळले अशी आशा इमारतीतील रहिवाशी व्यक्त करू लागले आहेत.