डोंबिवली पूर्व भागातील आयरे गाव, तुकाराम नगर, भोपर येथील सरकारी, सीआरझेड भागातील जमिनींवर भूमाफियांनी सुमारे ७० ते ८० अनधिकृत चाळी उभारण्याचे काम सुरू केले आहे. या जागेवर विटा, सिमेंट, रेतीचे ढीग लावण्यात आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी पालिकेच्या उद्यान विभागाने भूमाफियांच्या विळख्यातून वाचवलेला गणपती विसर्जन तलाव पुन्हा या माफियांनी गिळंकृत करून तलावाच्या भोवती माती टाकून चाळी उभारण्यास सुरुवात केली आहे. या भागातील एकूण अनधिकृत चाळींची संख्या सुमारे ५०० हून अधिक झाली आहे.
पालिकेच्या ‘ग’ प्रभागाच्या हद्दीत हा भाग येतो. या भागात कारवाई करण्यास गेल्यावर माफिया पालिका कर्मचाऱ्यांवर चाल करून येतात. पोलीस बंदोबस्त मिळत नाही, अशी तकलादू कारणे अधिकाऱ्यांकडून तक्रारदार नागरिकांना देत आहेत. या भागात अनधिकृत चाळी उभारणाऱ्या माफियांचा सव्‍‌र्हे पालिकेने केला आहे. या माफियांची नावे, घर, पत्ते माहिती असूनही पालिका अधिकारी या बांधकामांवर कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार दर आठवडय़ाने या भागात पाहणी करून जातात. ते नक्की कोणती पाहणी करतात या विषयी तक्रारदार नागरिकांमध्ये कुतूहल आहे. चाळी तोडण्यास जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर भूमाफिया हल्ला करतात. पण गुपचूप या भागात भ्रमंती करणाऱ्या उपायुक्त सुरेश पवार यांना मात्र ते काहीही करत नाहीत याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही माफिया संध्याकाळच्या वेळेत काही अधिकाऱ्यांच्या दालनात बसलेले असतात.
पालिकेने केलेल्या सर्वेक्षण यादीत गोरे, पावशे, सावंत, पवार, केणे, भोईर, म्हात्रे या माफियांची नावे आहेत. गेल्या आठवडय़ात या माफियांनी ट्रकवारी रेती, सिमेंट या भागात आणून चाळी उभारण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामांना पालिकेच्या जलवाहिनीवरून चोरून पाणी घेऊन वापरण्यात येत आहे. काही नगरसेवकही या बांधकामात पडद्यामागून सक्रिय असल्याचे बोलले जाते. या बांधकामांमधून दरमहा पालिका अधिकारी, काही नगरसेवक लाखो रुपयांचा ‘चंदा’ जमा करीत असल्याचे बोलले जाते. येत्या दहा महिन्यांनी पालिकेच्या निवडणुका असल्याने जाता जाता मारला हात म्हणून काही नगरसेवक या बांधकामांकडे आपला धंदा म्हणून पाहत आहेत.
उपायुक्त सुरेश पवार यांच्या दुर्लक्षामुळे ही बांधकामे उभी राहत असल्याची टीका तक्रारदार नागरिकांकडून केली जात आहे. पवार यांना आयुक्त पाठीशी घालत असल्यामुळे ते हे उद्योग करीत असल्याचे बोलले जाते. ग प्रभागाच्या सभापती कोमल निग्रे यांनी घटनास्थळाची पाहणी करून ही सर्व अनधिकृत बांधकामे पाहिली असून त्याची छायाचित्रे पालिका अधिकाऱ्यांना दाखवली आहेत. तरीही अधिकारी कारवाई करीत नसल्याने काय करायचे या विवंचनेत नगरसेविका निग्रे आहेत.
आयुक्त, उपायुक्त दखल घेत नसल्याने या बांधकामांच्या छायाचित्रांसह मुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्याकडे कोमल निग्रे तकार करणार आहेत. निग्रे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.