प्रशासकीय यंत्रणा विधानसभा निवडणुकीच्या कामात मग्न असल्याचा गैरफायदा घेत दिवा येथे सध्या मोठय़ा प्रमाणात लकी कंपाऊंडसदृश अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अतिशय निकृष्ट दर्जाच्या बैठय़ा चाळी आणि बहुमजली इमारतींमुळे मूळच्या खाडी किनारीच्या या टुमदार गावाची आता पार रया गेली असून एक अतिशय बकाल उपनगर म्हणून दिवा ओळखले जाऊ लागले आहे. स्वस्त घरांच्या आमिषाने मुंबई परिसरातील हजारो कनिष्ठ मध्यमवर्गीय दिव्यात आले असून पाणी, वीज आणि रस्ते या प्राथमिक सुविधांसाठीही त्यांना अक्षरश: झगडावे लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी मुंब्रा-डायघर येथील लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामे किती धोकादायक ठरू शकतात, याचे विदारक चित्र समोर आले होते. किमान त्यानंतर तरी अशी बांधकामे महापालिका प्रशासनाने रोखावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दिव्यात सारे नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरूच आहे. विशेषत: पूर्व विभागातील मुंब्रादेवी कॉलनी ते दातिवली रस्त्याच्या दुतर्फा सध्या बिनदिक्कतपणे नव्या अनधिकृत बांधकामांचे इमले रचले जात आहेत. तसेच जुन्या इमारतींवरही नवे मजले वाढविले जात आहेत. सध्या विधानसभा निवडणुकांमुळे प्रशासकीय यंत्रणा  मग्न असल्याचा गैरफायदा घेऊन इमारतीची बांधकामे उभी करण्याचा सपाटा भूमाफियांनी लावला आहे.
पाण्याची बोंब
सध्या तब्बल ४० टक्के दिवावासीयांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. विजेचाही लपंडाव सुरू असतो. रस्त्यांची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. मुंब्रादेवी-दातिवली मार्गावरच काही महिन्यांपूर्वी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वायर पडून बसलेल्या विजेच्या धक्क्य़ाने एका लहान मुलीला जीव गमवावा लागला होता. विशेष म्हणजे त्या रस्त्याची परिस्थिती अजूनही ‘जैसै थे’च आहे. सांडपाण्याचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे भर रस्त्यांवर गटारे वाहत आहेत.
अनधिकृत बांधकामे, संशयास्पद रहिवासी
गेल्या काही महिन्यांत नायजेरीयन नागरिक मोठय़ा संख्येने दिव्यात राहायला आले आहेत. दिव्यातील एका रहिवाशाने दिलेल्या माहितीनुसार सध्या किमान दीडशे नायजेरीन कुटुंबे दिव्यात वस्ती करून आहेत. ते कुठून आले, त्यांचे उद्योग काय याविषयी कुणालाही काहीही माहिती नाही, असेही त्याने सांगितले. प्राथमिक सुविधांच्या अभावाबरोबरच वाढती गुन्हेगारी ही दिव्यातील सध्या मोठी समस्या आहे.   
वस्ती दोन लाख, पोलीस अवघे दोन
दोन लाखांच्यावर लोकसंख्या असूनही अद्याप दिव्यात स्वतंत्र पोलीस स्टेशन नाही. मुंब्रा पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिव्यातील बंदोबस्तासाठी आठ पोलिसांची नेमणूक करण्यात येते. त्यातील चार दिवसा तर चार रात्री असतात. मात्र रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्षात अवघे दोनच पोलीस दिव्यात असतात. मात्र आपत्कालीन परिस्थितीत त्यांनाही शोधावे लागते. कारण त्यांना बसण्यासाठी साधी पोलीस चौकीही सध्या दिव्यात नाही.
स्वस्त घरांचे सापळे
इतक्या असुविधा सहन करूनही केवळ स्वस्त घरांमुळेच दिव्यातील घोकादायक सापळ्यात कनिष्ठ मध्यमवर्गीय अडकत आहेत. कारण चाळींमध्ये अवघ्या दोन-चार लाखांमध्ये तर बहुमजली इमारतींमध्ये पाच ते १५ लाखांमध्ये येथे घरे उपलब्ध आहेत. अगदी बदलापूर, अंबरनाथ येथेही इतक्या स्वस्त दरात घरे उपलब्ध नाहीत.         
प्रशासन नॉटरिचेबल..
यासंदर्भात वारंवार प्रयत्न करूनही महापालिका प्रशासनाचे अधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.