ठाणे- बेलापूर मार्गावरील महापे नाका एमआयडीसी येथे सव्‍‌र्हिस रोड बांधण्यात आला आहे. या सव्‍‌र्हिस रोडच्या बाजूला एमआयडीसीची जलवाहिनी असून या जलवाहिनीला लागून झोपडपट्टी वसवण्यात आली आहे. या झोपडपट्टीमध्ये रहिवाशांनी सव्‍‌र्हिस रोड व पदपथावर कब्जा करून अतिक्रमण केले आहे. पाण्यासाठी या रहिवाशांकडून वारंवार एमआयडीसीची जलवाहिनी फोडण्यात येत असल्याने पाण्याची मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. या झोपडय़ांवर वारंवार अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येते. मात्र अधिकाऱ्यांची पाठ फिरताच या झोपडय़ा पुन्हा उभ्या राहत आहेत. काही राजकीय नेत्यांकडून एमआयडीसीच्या जागा गिळंकृत करण्यासाठी भूमाफियांना हाताशी धरुन अतिक्रमण करण्याचे पेव सध्या नवी मुंबईत फुटले आहे. दोन महिन्यांपूर्वी एमआयडीसी व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने महापे नाका येथे बांधण्यात आलेल्या अनाधिकृत झोपडय़ांवर कारवाई करण्यात आली. या वेळी झोपडपट्टीधारकांनी अतिक्रमण पथकावर दगडफेक करत झोपडय़ांना आग लावून देण्याची घटना घडली होती. त्यानंतर एमआयडीसी व सिडकोने पोलीस संरक्षणात या झोपडय़ांवर कारवाई करत हा भाग अतिक्रमणमुक्त केला. पंरतु पुन्हा आता या ठिकाणी झोपडया बांधण्याचा सपाटा भूमाफियांनी लावला आहे. यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यासाठी करण्यात येत असलेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जात असल्याची मत व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात एमआयडीसीचे उप कार्यकारी अभियंता पी. पंतगे यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी बांधण्यात आलेल्या झोपडय़ांवर कारवाई करण्यास्ांदर्भात अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.