उरणमधील सिडकोने विकसित केलेल्या द्रोणागिरी नोड या औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बेकायदा पार्किंग बंद करण्यासाठी सिडकोने प्रमाणित केलेल्या साडेसात एकर जमिनीवरील सर्व सुविधांनी युक्त ग्रीन फिल्ड ट्रक टर्मिनलची उभारणी करण्यात आली असतानाही, त्याऐवजी रस्त्याच्या कडेला व सिडकोच्या मोकळ्या जागेत अवजड वाहनांची पार्किंग करून या वाहनधारकांकडून ३० ते ५० रुपयांची अनधिकृत वसुली केली जात असल्याने द्रोणागिरीमधील बेकायदा पापार्किंगवर अनधिकृत वसुलीधारकांची टोळधाड सुरू आहे.
उरण तसेच जेएनपीटी परिसरातील वाहतूक कोंडीविरोधात येथील जनतेने केलेल्या आंदोलनानंतर सिडकोने प्रमाणित केलेल्या ग्रीन फिल्ड ट्रक टर्मिनलची उभारणी मार्च २०१४ मध्ये करण्यात आली आहे. या ट्रक टर्मिनलमध्ये बेकायदा पार्किंगमुळे अवजड वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करून शौचालये, वीज, पिण्याचे पाणी, वाहनचालकांसाठी अंघोळीची व्यवस्था, तसेच वाहनचोरी होऊ नये म्हणून संरक्षण याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्याचप्रमाणे या अधिकृत पार्किंगमुळे या परिसरात निर्माण होणारे सामाजिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. असे असले तरी या परिसरात सिडकोच्या खुल्या भूखंडावर तसेच रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात येणाऱ्या अवजड वाहनांकडून बेकायदेशीरपणे वसुलीसाठी छापील पावत्या देऊन ही वसुली केली जात आहे. त्यामुळे अधिकृत असलेल्या पार्किंगमध्ये वाहनचालक येत नसल्याची माहिती ग्रीन फिल्ड ट्रक टर्मिनलचे साइट इन्चार्ज संतोष भगत यांनी दिली आहे. यासंदर्भात सिडको तसेच पोलिसांकडेही तक्रार करण्यात आलेली असून बेकायदा वसुली करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे.