शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. त्यांनी शिवसेनेचा केलेला विश्वासघात मतदारच सहन करणार नाहीत, असा विश्वास पक्षाचे जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे यांनी व्यक्त केला.
गाडे म्हणाले, शिवसैनिकांनी जिवाचे रान केले म्हणूनच गेल्या वेळी वाकचौरे संसदेत पोहोचू शकले, याची जाणीव त्यांना राहिली नाही. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी शिर्डीत जाहीर मेळाव्यात साईबाबांची शपथ घेऊन आपण शिवसेनेकडूनच निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. पुढच्या महिनाभरात त्यांना गद्दारीचे वेध लागले. येत्या निवडणुकीत साईबाबाच त्यांची झोळी रिकामी करतील असा विश्वास गाडे यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवारी (दि. २८) ‘नोकरी तुमच्या दारी’ अभियान आयोजित करण्यात आल्याची माहिती गाडे यांनी दिली. हॉटेल यश पॅलेसमध्येच हा मेळावा होणार असून, मुंबई येथील पॅराडिंग बिझनेस सोल्युशन कंपनीच्या सहकार्याने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दहावी उत्तीर्णापासून ते संगणक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी पात्र उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. नगरसह शेजारील जिल्हय़ातील औद्योगिक वसाहतींमधील खासगी उद्योगांमध्ये या नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहेत. इच्छुकांनी त्यांच्या कागदपत्रांसह येथे उपस्थित राहावे असे आवाहन गाडे यांनी केले. शहरप्रमुख संभाजी कदम, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र दळवी, अनिल कराळे आदी या वेळी उपस्थित होते.
 इच्छुकांची हजेरी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक लहू कानडे व सदाशिव लोखंडे हे दोघेही गाडे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी येथे आले होते. त्यांनीही पत्रकारांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. दोघांपैकी कोणालाही उमेदवारी मिळाली तरी विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.