दिवाळीच्या भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या बहिणीच्या मुलीचे अपहरण करून खून करण्याचा प्रकार मामाने केल्याची घटना वाळवा तालुक्यातील भोगाव येथे गुरुवारी उघडकीस आली. संशयित तरुणाला कोकरूड पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुलीवर अतिप्रसंग झाला की काय? हे पाहण्यासाठी मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्रीमती कविता हणमंत शिरसाट (रा. शिरसाटवाडी ता. शिराळा) या आपली मुलगी वैष्णवी (वय ७) हिच्यासोबत माहेरी हातुगडेवाडी येथे दिवाळीच्या भाऊबीजेसाठी आल्या होत्या. भाऊबीज झाल्यानंतर बुधवारी  दि. ६ नोव्हेंबर रोजी महिलेचा भाऊ विठ्ठल तुकाराम हातुगडे (वय २०) हा भाचीचे केस कापण्यासाठी म्हणून घेऊन गेला होता. त्यानंतर दिवसभर या दोघांची वाट पाहिली. मात्र ते दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कोकरूड पोलिस ठाण्यात दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
विठ्ठलचा शोध घेत असताना गुरुवारी सकाळी तो कासेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना मिळून आला. त्याच्याकडे मुलीसंदर्भात चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच भाचीचा गळा दाबून खून केल्याचे त्याने कबूल केले. खुनानंतर या मुलीचा मृतदेह भोगावच्या शिवारात मातीमध्ये पुरून ठेवल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी पुरलेला मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात धाडला आहे.
भाचीचा खून करणारा विठ्ठल हा तरुण बारावीपर्यंत शिक्षण झालेला असून सध्या तो बेकार आहे. त्याने भाचीवर अतिप्रसंग केल्याचा पोलिसांचा संशय असून मृतदेहाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर ही बाब स्पष्ट होणार असल्याचे पोलिस अधीक्षक दिलीप सावंत यांनी सांगितले. या प्रकरणी कोकरूड पोलिस अधिक तपास करीत आहेत.