पेशवाईत नारायणरावांनी आपले काका रघुनाथराव यांना शेवटच्या क्षणी मारलेली ‘काका मला वाचवा’ ही आर्त किंकाळी इतिहासप्रसिद्ध आहे. नवी मुंबईत सध्या एका पुतण्याची ‘काका, मला फक्त प्रेम हवे होते’ या हाकेचा आवाज सध्या घुमत असून काका-पुतण्याच्या या नाटय़ातील काका राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक आहेत, तर त्यांचा पुतण्या माजी महापौर तुकाराम नाईक यांचा मुलगा वैभव नाईक आहे. विशेष म्हणजे तुकाराम नाईक यांनीही मृत्यूपूर्वी सात वर्षे नाईकांबरोबर फारकत घेतली होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज त्यांचा मुलगाही नाईक यांच्यापासून दूर जात आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांच्या दोन भावांपैकी तुकाराम नाईक (नाना) यांचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांचा वैभव नाईक हा मोठा मुलगा आहे. नाईक यांचा दुसरा भाऊ ज्ञानेश्वर नाईक यांचा मुलगा सागर नवी मुंबईचे महापौर पद भूषवीत आहेत. नवी मुंबई पालिकेत मे १९९५ रोजी पहिली नगरसेवकांची सत्ता आल्यानंतर शहराचे महापौर पद आपल्याला मिळावे यासाठी तुकाराम नाईक प्रयत्नशील होते. ते त्यांना न मिळता नाईक यांनी आपले ज्येष्ठ चिरंजीव विद्यमान ठाणे खासदार संजीव नाईक यांना दिल्याने तुकाराम नाईक भावावर नाराज झाले होते. तुकाराम नाईक हे गणेश नाईक यांचे सर्व अर्थकारण सांभाळणारे असल्याने ते नाईकांच्या अतिशय जवळ मानले जात होते. मुलगा- भाऊ या नातेसंबंधात पुत्रप्रेम श्रेष्ठ ठरल्याने त्यानंतर भावांमधील दरी वाढत गेली. एप्रिल १९९७ मध्ये गणेश नाईक यांच्यावर शिवसेनेची संक्रांत कोसळल्यावर तोडफोडीच्या राजकारणात तुकाराम नाईक यांनी काँग्रेसचे काही नगरसेवक गळाला लावून नाईक यांच्या नवी मुंबई विकास आघाडीचे महापौर पद पटकाविले, पण त्यामुळे दोन भावांमधील वितुष्ट कमी होण्याऐवजी वाढत गेले. जून १९९९ मध्ये नाईक यांनी राष्ट्रवादीचे घडय़ाळ हातावर बांधले, पण तुकाराम नाईक यांनी शिवसेनेत स्वगृही जाणे पसंत केले. दोन भावांतील संघर्ष विकोपाला गेल्याने एकदा गणेशोत्सवाच्या काळात नाईक यांनी सर्वासमोर तुकाराम नाईक यांच्या श्रीमुखात भडकवली. त्यामुळे शहरात दोन भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षांत असून एकमेकांना पाण्यात बघत असल्याचे चित्र होते. शिवसेनेत फारसे महत्त्व नसणारे नाना नंतरच्या काळात वैफल्यग्रस्त झाले. त्यातच त्यांचा कावीळने मृत्यू झाला. त्या वेळी शेवटच्या दिवसांत नाईक यांनी सर्व मतभेद विसरून भावाला जवळ केले.  दोन भावांतील भांडणामुळे दोन कुटुंबांमध्ये निर्माण झालेली लक्ष्मणरेषा नंतर पुसली गेली. पाच वर्षांनंतर इतिहासाची पुनर्वृत्ती सुरू झाली असून वैभव नाईक यांनी शिवसेनेशी घरोबा करण्याचे जवळजवळ निश्चित केले आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि मातोश्रीचे आता फार सख्य नाही. ऐरोली येथील दत्ता मेघे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये दोन वर्षांपूर्वी झालेला चौगुले यांचा मुलगा ममित आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहुणीचा मुलगा वरुण यांच्यात कॉलेज प्रतिनिधीवरून झालेले भांडण या दरीला कारणीभूत आहे. रश्मी ठाकरे यांचा त्यामुळे चौगुले यांच्यावर राग आहे. त्यामुळे चौगुले यांनी अनेक वेळा निमंत्रण देऊनही ठाकरे नवी मुंबईत येत नाहीत. चौगुले यांचा पत्ता कट करून ऐरोली विधानसभा मतदारसंघात आमदार संदीप नाईक यांच्या विरोधात त्यांचा चुलतभाऊ वैभव नाईक यांना उभे करण्याची व्यूहरचना रचली जात असल्याचे समजते. त्या दृष्टीने आदित्य ठाकरे व वैभव नाईक यांची भेट झालेली आहे.