स्मशानात काम करणारे,कब्रस्तानात कबर खणणारे,पर्यावरण समतोलासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन करण्याचे वेड लागलेले, जीव धोक्यात घालून दुसऱ्यांना जीवदान देणारे, अविरतपणे धार्मिक सलोखा राखण्यासाठी धडपडणारे, अशा विविध क्षेत्रात असामान्य कार्य करूनही कोणीही दखल न घेतलेल्या समाजसेवकांचा येथील पोलिसांच्या वतीने गौरव करण्यात आला.
पोलिसांतर्फे व्यापक प्रमाणात ध्वजवंदन दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने सप्ताहभर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या संकल्पनेतून शहर व तालुक्यातील एकूण ६९ जणांना गौरविण्यात आले. माजी मंत्री डॉ.बळीराम हिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास आ. दादा भुसे, आ. मौलाना मुफ्ती इस्माइल, अप्पर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, महापालिका आयुक्त अजित जाधव, प्राचार्य डॉ. सुभाष निकम, डॉ. मंजूर अयुब्बी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांची शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली.