डोंबिवली शहराच्या विविध भागांत विशेषत: पश्चिम भागात दिवसा आणि रात्रीच्या वेळेत नियमितपणे दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणतर्फे हे अघोषित वीज भारनियमन सुरू आहे का असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. खंडित होणाऱ्या वीज पुरवठय़ाचे पैसे महावितरण वीज बिलातून कमी करणार आहे का? वीज देयक भरण्यास थोडा उशीर झाला तरी वीज मीटर कापून नेणारे महावितरणचे अधिकारी या सतत होणाऱ्या खंडित वीजपुरवठय़ाविषयी गप्पगार का बसले असे प्रश्न नागरिकांकडून संतप्तपणे केले जात आहेत. महावितरणचे अधिकारी मात्र पावसामुळे केबलमध्ये पाणी घुसले, पालिकेने जागोजागी रस्त्यांसाठी खड्डे केले आहेत. त्यामुळे हे बिघाड होत आहेत अशी उत्तरे देत आहेत.