अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन (रिव्हॅल्युएशन) योग्यरितीने झाले नसल्याचे नागपूर विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीनेच मान्य केले असून, या सर्व उत्तरपत्रिकांची पुन्हा फेरमूल्यांकन व्हावे अशी शिफारस केली आहे.
अभियांत्रिकी विद्याशाखेतील उत्तरपत्रिकांचे ‘अंडरव्हॅल्युएशन’ झाल्याच्या, तसेच गुणांच्या बेरजेतही भयंकर चुका झाल्याच्या सहा हजारांहून अधिक तक्रारी विद्यापीठाला मिळाल्या होत्या. बहुतांश विद्यार्थ्यांच्या बाबतीत, फेरमूल्यांकनासाठी केलेल्या अर्जाला ‘नो चेंज’ हे छापील उत्तर मिळाले होते. सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता, न्यायालयाने काहीजणांच्या उत्तरपत्रिका दिल्ली येथील आयआयटीतील तज्ज्ञ प्राध्यापकांकडून तपासून घेतल्या, तेव्हा काहीजणांच्या गुणात २० ते ३० गुणांची वाढ झाली. त्यामुळे न्यायालयाने याचिकाकर्त्यां विद्यार्थ्यांचे पुन्हा फेरमूल्यांकन करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या निर्णयामुळे सुमारे ४४० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
या मुद्यावर बरीच ओरड झाल्यानंतर विद्यापीठाने या तक्रारींच्या पडताळणीसाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती नेमली. या समितीने तिचा गोपनीय अहवाल परीक्षा मंडळाच्या गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत सादर केला. हा अहवाल परीक्षा मंडळाच्या सदस्यांनी पुढील कारवाईसाठी स्वीकारला आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत फेरमूल्यांकनामध्ये, तसेच गुणांच्या पडताळणीत चुका झाल्याचे सांगून या समितीने मूल्यांकनकर्त्यांवर (इव्हॅल्युएटर्स) ताशेरे ओढले आहेत. मूल्यांकन करणाऱ्यांनी किंवा फेरमूल्यांकन करणाऱ्यांनी या चुका केल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर, तथ्य पडताळून पाहण्यासाठी या उत्तरपत्रिकांचे पुन्हा फेरमूल्यांकन (रि-रिव्हॅल्युएशन) करण्याची शिफारस समितीने परीक्षा मंडळाला केली आहे. समितीने गेल्या १३ जानेवारीला कुलगुरूंना आपला अहवाल सादर केला होता. परीक्षा मंडळाने मागितल्यास या प्रकरणातील आणखी तपशील देण्याची तयारी समितीच्या सदस्यांनी दर्शवली आहे.
सत्यशोधन समितीच्या नऊवेळा बैठका झाल्या. शेवटच्या बैठकीत, गेल्या ३ जानेवारीला समितीच्या सदस्यांनी प्राथमिक छाननीनंतर या मुद्याची सविस्तर चर्चा केली. फेरमूल्यांकन चुकीचे झाल्याबाबत अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेतून ३ हजार २५४ अर्ज आले असून, वाणिज्य शाखेतून चार, तर विधि शाखेतून एक अर्ज मिळाला आहे. मात्र वाणिज्य आणि विधि विद्याशाखेतील अर्जाच्या बाबतीत ठोस पुरावा किंवा चुका आढळल नाहीत. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या बाबतीत समितीने अर्जाची शाखानिहाय, विषयनिहाय आणि फॅकल्टीनिहाय छाननी केली. काही अर्ज सहज केलेले, तर काही केवळ स्वाक्षऱ्या बदलून त्याच नमुन्यात असलेले आढळले. समितीने स्पष्टपणे केलेली शिफारस आणि परीक्षा मंडळाने तिला दिलेली मान्यता, या बाबी म्हणजे परीक्षकांनी किती निष्काळजीपणा दाखवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला याचा पुरावा आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेला बसलेल्या प्रथम वर्षांच्या २१ हजार विद्यार्थ्यांपैकी १६ हजारांनी फेरमूल्यांकनासाठी अर्ज केले होते. अशारितीने बेजबाबदारपणे उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याखाली कर्तव्यात हयगय केल्याबद्दल कारवाईची जोरदार मागणी होत आहे.