डोंबिवलीत चोरीच्या वाढत्या घटनांमुळे भयभीत झालेल्या काही जवाहिऱ्यांनी दुकानातील उपलब्ध जागेतील जमिनी खोदून स्ट्राँगरूम तयार केल्याची माहिती पुढे येऊ लागली आहे. ही स्ट्राँगरूम तयार करताना पुरेशी जागा नसल्याने काही जवाहिऱ्यांनी थेट इमारतीचा पाया खणून स्ट्राँग रूम तयार केल्या असल्याच्या तक्रारी पुढे  येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ‘उपर मकान नीचे दुकान’, अशी परिस्थिती असलेल्या इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता रहिवाशांकडून व्यक्त होऊ लागली असून महापालिकेकडे अशा स्वरूपाच्या तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे.डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या काही जवाहिरांकडून पाया खोदण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. काही महिन्यांपूर्वी मानपाडा रस्त्यावरील एका जवाहिऱ्याचे दुकान चोरटय़ांनी लुटले होते.  मुलुंड, घाटकोपर येथील काही बडय़ा जवाहिरांनी कल्याण, डोंबिवली परिसरात आपले व्यवसाय थाटले आहेत. लाखो रुपयांचा ऐवज दररोज दुकानातून घरी नेणे अनेकांना शक्य होत नसल्याने सुरक्षिततेसाठी काही व्यापाऱ्यांनी आटोपशीर जागेत जमीन खोदून स्ट्राँगरूम तयार केल्या आहेत. दुकान बंद करताना सर्व ऐवज जमिनीखाली या स्ट्रॉगरूममध्ये ठेवला जातो. यासाठी इमारतीचा तळाचा भाग खोदण्यात येतो. काही दुकानांमध्ये इमारतीच्या पायाला धक्का पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. मानपाडा रस्त्यावरील काही रेडीमेड कपडे विक्रेते, चप्पल विक्रेते, जवाहिऱ्यांनी दुकानाला पोटमाळे तयार केल्याने इमारतींच्या बांधकामाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत.  तळमजल्यावरील एका दुकानात करण्यात आलेल्या फेरबदलांमुळे भिवंडी परिसरातील एक इमारत दोन वर्षांपूर्वी कोसळली होती. त्यामुळे यासंबंधी इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंबंधी महापालिकेचे प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले, जमीन खोदून कोणी स्ट्राँगरूम तयार करीत असेल तर इमारतीची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.   फ प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतच्या तक्रारी आलेल्या नाहीत, पण अशा हालचाली सुरू असतील तर संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.