मेट्रो चित्रपटगृहासमोर वासुदेव बळवंत फडके चौकात बांधलेला भुयारी मार्ग वास्तविक स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. या भुयारी मार्गात नवोदित व होतकरू चित्रकारांसाठी कलादालन होऊ घातले आहे. मात्र हा भुयारी मार्ग पालिकेच्या नेमक्या कोणत्या विभागाच्या अखत्यारीत आहे याचा पत्ता पालिकेच्याच अधिकाऱ्यांना नाही. सत्ताधारी शिवसेनेच्या अनेक नेत्यांचे ‘कले’शीच वावडे असल्याने त्यांच्याकडून या संदर्भात फार काही होईल ही अपेक्षा व्यर्थच आहे. त्यामुळे या कलादालनाचे सगळेच घोडे अडले आहे.
राज्यभरात सुमारे २५० कला महाविद्यालये आणि संस्था आहेत. यातील बहुतांश ठिकाणी शासनमान्य ‘आर्ट क्राफ्ट अ‍ॅण्ड डिझाईन’चे अभ्यासक्रम शिकविले जातात. चित्रप्रदर्शनाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जहांगीर आर्ट गॅलरीत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्याची मनीषा सर्वच चित्रकार मनात बाळगून असतात, परंतु बेताची आर्थिक स्थिती आणि चार-चार वर्षे आरक्षण मिळत नसल्यामुळे ‘जहांगीर’मध्ये चित्रप्रदर्शन भरविण्याचे नवोदित चित्रकारांचे स्वप्न स्वप्नच राहते. नवोदित चित्रकारांना, तसेच कला महाविद्यालयात धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वासुदेव बळवंत फडके भुयारी मार्गात कलादालन सुरू करण्याचा मानस ‘कला-विद्या संकुल पॉलिटेक्निक’चे प्रा. मनोज सामंत यांनी दोन वर्षांपूर्वी व्यक्त केला होता.
पालिका अधिकाऱ्यांनी या भुयारी पादचारी मार्गाची पाहणी केल्यानंतर कलादालनच्या योजनेस प्रशासनाने तात्काळ हिरवा कंदील दाखविला होता. ‘कला-विद्या संकुल पॉलिटेक्निक’ने करारपत्रही सादर केले. मात्र त्यास आता दोन वर्षे उलटली तरी कलादालनाची फाइल एका विभागातून दुसऱ्या विभागात फिरतेच आहे. त्यातच भुयारी मार्ग नेमक्या कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येतो याचाच पालिका अधिकाऱ्यांना पत्ता नाही. सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त (शहर) मोहन अडतानी यांच्याकडे ही फाइल गेली. अडतानी यांनी सर्व सोपस्कार करून आयुक्त सीताराम कुंटे यांची मंजुरीही घेतली. त्यानंतर करारपत्र करण्यासाठी उपायुक्तांकडे ही फाइल पाठविण्यात आली, मात्र त्या वेळी भुयाराची मालकी मुख्य अभियंता (रस्ते आणि पूल) यांच्याकडे असल्याचा साक्षात्कार उपायुक्तांना झाला आणि ही फाइल रस्ते आणि पूल विभागाकडे सरकविण्यात आली. रस्ते आणि पूल विभागाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त श्रीनिवास यांच्याकडे असून गेले अनेक महिने ही फाइल त्यांच्या टेबलावर धूळ खात पडली आहे.
या भुयारी मार्गाची जबाबदारी नेमकी कोणत्या खात्याकडे येते हे निश्चित होऊन त्या खात्याने तेथील कलादालनाला अंतिम मंजुरी देण्यासाठी आणखी किती काळ जाणार हे महापौर अथवा आयुक्त सांगू शकतील का, असा प्रश्न राज्यभरातील हजारो नवोदित चित्रकार आणि चित्रकला शिक्षक व रसिकांना पडला आहे.
पुण्याचा आदर्श – पुणे महापालिकेने तेथील प्रसिद्ध डेक्कन जिमखान्यावरील गरवारे पुलाखाली अशाच पद्धतीने चित्रदालन सुरू केले आहे. पुणे महापालिकेने या दालनाला केवळ एक महिन्यात मंजुरी दिली होती. वासुदेव बळवंत फडके भुयारी मार्गात पादचाऱ्यांचा वावर तसा तुरळकच आहे. समाजकंटक आणि गर्दुल्ल्यांचा वावर मात्र वाढला आहे. त्यामुळे तेथे सीसी टीव्ही बसविण्याची आणि सुरक्षारक्षक तैनात करण्याची वेळ पालिकेवर आली होती. तेथे कलादालन सुरू झाल्यास चित्ररसिकांचा वावर वाढेल, पादचारीही भुयारी मार्गाचा वापर करू लागतील आणि अपघात टळतील. मात्र ‘अर्थकारणात’ गुंतलेल्या पालिका अधिकाऱ्यांना हे समजावणार कोण?