गेल्या काही वर्षांपासून उन्हाळ्याचा कार्यकाळ वाढत आहे. वाशीम जिल्हा हा नियमित पाऊस पडणारा भाग असूनही आपल्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जलसंधारण व भूजल पुनर्भरण हाच त्यावरील शाश्वत उपाय आहे. त्यासाठी गावनिहाय नियोजन करण्याची व लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
वाशीम तालुका पाणीटंचाई मोहिमेंतर्गत जलसंधारण व भूजल पुनर्भरण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर, जिल्हा कृषी अधीक्षक साहेबराव दिवेकर, ‘आत्मा’चे संचालक विजय चवाळे, जिल्हा परिषदेचे सभापती किसनराव मस्के, वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, तहसीलदार आशीष बीजवल, रिसोडचे तहसीलदार मनोज लोणारकर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, राज्यात दरवर्षी पाणीटंचाई निवारणासाठी शासन कोटय़वधी रुपये खर्च करते. मात्र, अनेक वर्षांपासून त्याच त्याच गावात पाणीटंचाई भासत असल्याची वस्तुस्थिती आहे. यावर मात करण्यासाठी जलसंधारण अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजनेत लोकांनी सहभागी झाले पाहिजे. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड, ‘आत्मा’चे संचालक विजय चवाळे यांनीही विचार व्यक्त केले.