राज्य शासनाने २०१३-१४ या शैक्षणिक सत्रासाठी कला निदेशकांच्या वेतनाची तरतूद केली नसल्याने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्य़ातील प्राथमिक  शाळांमधील अंशकालीन कलानिदेशकांवर बेरोजगारीची वेळ येणार असल्याचे वृत्त आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षणाचे ज्ञान मिळावे, या हेतूने शासनाच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये कला निदेशकांची नियुक्ती केली होती.
ही नियुक्ती अंशकालीन असून त्यांना मानधनही तासिका तत्त्वानुसार देण्यात येत होते.
प्राथमिक विभागाच्या अभ्यासक्रमात निर्धारित केल्यानुसार त्यांना आठवडय़ात किमान १२ तासिका घेणे बंधनकारक केले होते. यापैकी काहींना १० महिने, तर काहींना पाच महिने करारबद्ध असलेल्या कलानिदेशकांचा करार १६ फेब्रुवारीला संपला, तर १० महिने करारबद्ध केलेल्या कलानिदेशकांचा करार ३० एप्रिलला संपणार आहे.
पुढील शैक्षणिक सत्रात नव्याने नियुक्ती व करार होईल, अशी कलानिदेशकांची अपेक्षा होती, परंतु पुढील शैक्षणिक सत्रात या कलानिदेशकांच्या वेतनासाठी शासनाने निधीची तरतूदच केलेली नाही. १९ मार्चला या संदर्भातील पत्र शासनाकडून सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे सध्या कलानिदेशकांवरच पुढील शैक्षणिक सत्रापासून बेरोजगारीची वेळ येणार असून त्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे चित्र आहे.