राज्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर अवकळा आणली असली तरी कोकणातील हापूस आंब्याबाबत ‘थोडी खुशी, थोडा गम’चा माहोल असल्याचे व्यापारी सांगत आहेत. शनिवार-रविवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचा आकार वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे, पण आंबा बागायतदार या प्रक्रियेला अबनॉर्मल समजत आहेत. हापूस आंबा हे एक लहरी पीक असून त्याबाबत अंदाज बांधणे कठीण असल्याचे आंबा बागायतदार उमेश लांजेकर यांनी स्पष्ट केले. आकार वाढल्याचे सुख नाही, पण फळ खराब होण्याची शक्यता वाढली असल्याचे आंबा बागायतदारांनी सांगितले. या पावसामुळे आता लागलेला मोहोर गळून पडल्याने मे महिन्यापर्यंत टिकणारा हापूस आंब्याचा मोसम या वर्षी लवकर आटोपणार आहे. दोन दिवस पडलेला अवेळीचा पाऊस आणखी दोन दिवस पडल्यास मात्र आंबा बागायतदारांची पुरती पंचाईत होणार आहे. त्यानंतर आंब्यावर रोगराई वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उन्हाळा आगमनाच्या पहिल्या आठवडय़ातील दोन दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडवून दिली आहे. कोकणातील हापूस आंबा व काजूवर तर संक्रांतच ओढवल्याचे चित्र आहे. मात्र यातून काही चांगली गोष्टही घडू शकते असे व्यापारी आणि आंबा उत्पादक संजय पानसरे यांचे मत आहे.
या दोन दिवसांच्या अवकाळी पावसाने ज्या झाडांना फलधारणा झाली आहे त्या हापूस आंब्यांवरील इतर मोहोर गळून जाणार आहे. त्यामुळे आहे त्या कैऱ्यांचा आकार वाढण्यास मदत होणार असल्याचे काही बागायतदारांचे मत आहे, पण रत्नागिरीचे आंबा बागायतदार उमेश लांजेकर यांनी हा पाऊस वाईटच म्हटले असून काही आंब्यांचा आकार वाढला तरी त्याचे दृश्यपरिणाम जाणवणार आहेत. त्यामुळे हाती येणारा हापूस चांगलाच असेल का, याची खात्री नाही. फेब्रुवारीत मोहोर धरलेल्या हापूस आंब्यांवरील मोहोर या पावसामुळे मातीमोल होण्याची शक्यता अधिक आहे. याच मोहोरावर मे महिन्याचा हंगामा मानला जातो.
तो आता कमी होणार असून ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी तऱ्हा आंबा बागायतदारांची झाली आहे. या वर्षी कोकणात अगोदरच हापूस आंब्याचे उत्पादन कमी मानले जात होते. ते आता अधिक कमी होणार आहे. त्यामुळे हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबोहर जाणार आहे. कमी पुरवठय़ामुळे दाम वाढण्याची शक्यता आहे. हापूस आंब्याप्रमाणे काजूचा मोहोरदेखील उन्मळून पडला आहे. त्यामुळे मोहरलेल्या काजूच्या झाडांची गतदेखील हापूस आंब्याच्या झाडांप्रमाणे झाली आहे.
अवकाळी पावसाचा फटका भाज्यांच्या आवकवर झाला असून तुर्भे येथील भाजी बाजारात सोमवारी केवळ ३५० गाडय़ा भरून भाजी आल्याने भाज्यांचे भाव ४० टक्क्यांनी वाढले आहेत. हा प्रकार येत्या चार-पाच दिवस राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.