उरण तालुक्यात शनिवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. अधूनमधून येणारा पाऊस आणि दाट धुके यांमुळे येथील आंबा, वाल तसेच विविध प्रकारच्या पालेभाज्यांवर संकट आले आहे. अनेक ठिकाणी आंब्याचे मोहर संपूर्णपणे नष्ट झाले आहेत. त्यामुळे या वर्षी उरण परिसरातील आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यात वालाच्या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले. नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
उरण तालुक्यात गेल्या तीन दिवसांत ५ मीलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. उरण तालुक्यातील नागाव, केगाव, मुळेखंड, म्हातवली तसेच पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, रानसई, विंधणे, वेश्वी, कोप्रोली, वशेणी आदी गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. येथे भात आणि आंब्याची लागवड मोठय़ा प्रमाणात होत असते.  या वर्षी आंब्याला चांगला मोहरही आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र अचनाक आलेल्या पावसामुळे आंब्याचा सगळा मोहरच नष्ट झाला आहे, अशी माहिती कोप्रोली येथील शेतकरी रूपेश पाटील यांनी दिली.  चिरनेर परिसरात भातशेतीचे पीक घेतल्यानंतर तातडीने शेतकरी वालाचे बी शेतात पेरतात, पावसाळ्यानंतर सुरू होणाऱ्या हिवाळ्यात पडणाऱ्या दवावर ही शेती पिकत असते. त्यामुळे या वालाच्या शेंगांना तसेच सुकविलेल्या वालांना चांगलीच चव असते. बाजारपेठेत त्याला मागणीही चांगली असल्याची माहिती चिरनेर येथील शेतकरी जयवंत ठाकूर यांनी दिली. परंतु पावसामुळे या पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. केगाव देवळी येथील अनुराग ठाकूर या शेतकऱ्याने शेतात लावलेला मुळा तसेच इतर पालेभाजी नष्ट झाली आहे. ती वाया गेल्याने गाई-म्हशींना ती खाण्यास घालण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.
नुकसानीचा अहवाल तयार करणार
उरणमधील पडलेल्या अवकाळी पावसाचा आढावा घेतला जात असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जात असल्याची माहिती उरणचे तालुका कृषी अधिकारी काशिराम वसावे यांनी दिली आहे. पाहणीनंतर नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.