अकाली आलेल्या पावसाने नरखेड तालुक्यातील गहू, चना, कापूस व मृगबहराच्या संत्रा पिकाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शुक्रवार आणि शनिवारी अचानक झालेल्या पावसाने तसेच वाऱ्याने गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले असून उत्पादनात अध्र्यापेक्षा जास्त घट होण्याची भीती शेतक ऱ्यांनी व्यक्त केली आहे. हरभरा पिकाचे पाऊस व गारपिटीने फूल गळल्याने क्षार नष्ट झाले असून तूर पिकाची कापणी शेतक ऱ्यांनी करून ठेवली होती ती पावसात ओली झाली. तसेच कापूससुद्धा ओला झाल्याने शेतक ऱ्यांवर चारही बाजूने संकट कोसळले आहे. नरखेड तालुक्यात कृषी भूमी ७५ टक्के असिंचित असल्याने हरभरा पेरणीचे क्षेत्र जास्त आहे. याच पिकावर शेतकऱ्यांची भिस्त असते, पण अकाली पाऊस आणि गारपिटीने संत्र्याला मार लागल्याने संत्रा गळण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
खैरगाव, गुमगाव, थुगावदेव, मदना, पेढमुक्तापूर आदी गावात गारपीट झाल्यामुळे ५० ते ६० टक्के नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे खरीप हंगामातसुद्धा शेतक ऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. सोयबीनचे उत्पादन प्रती एकर १ ते ३ पोतेच झाले. काही शेतक ऱ्यांनी सोयाबीन गोळा केलाच नाही तर जमिनीतील ओलावा पाहून हरभऱ्याची लागवड केली; परंतु अकाली पाऊस व गारपीट यामुळे शेतक ऱ्यांच्या पदरी निराशाच आली. गव्हाचे उत्पादनही ५० टक्के कमी होण्याची शक्यता आहे. नरखेड तालुक्याचे तहसीलदार डी.जी. जाधव यांनी पाहणी करून तलाठय़ांकडून अहवाल मागितला आहे. शेतक ऱ्यांचे नुकसान १० टक्केपेक्षा जास्त झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक ऱ्यांनी केली आहे.