विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त रविभवनातील जवळपास सर्वच कॉटेजेस गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाने बुक करण्यात आले असले तरी उपमुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेला देविगरीबाबत मात्र अजूनही अनिश्तिता कायम आहे. राज्यमंत्र्याचे निवासस्थान असलेला नागभवन परिसरातील कुटीर सुसज्ज ठेवण्यासाठी दिवस रात्र काम सुरू आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सध्या तरी नवे उपमुख्यमंत्रीपद रिक्त आहे. मुख्यमंत्री गेल्या महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल अशी घोषणा केली होती मात्र त्या संदर्भात अजुनपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही. अधिवेशनाला १३ दिवसाचा अवधी राहिला असून रविभवनातील सर्व कॉटेज गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षी कॅबिनेट मंत्र्याच्या नावाने निश्चित करण्यात करण्यात आले आहे मात्र, उपमुख्यमंत्र्याचे निवासस्थान असलेला देवगिरी बंगला आणि परिसर रंगरंगोटी करून सुशोभित करण्यात आला असला तरी त्यात कोण राहणार याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.
गृहमंत्री आर.आर. पाटील यांची निवासव्यवस्था देवगिरीमध्ये राहणार असल्याची चर्चा होती मात्र, त्यांची निवास व्यवस्था रविभवनमध्ये करण्यात आली आहे. विधि मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी नुकतीच विधिमंडळाच्या इमारतीसोबत देवगिरी, रविभवन, नागभवन आणि आमदार निवास या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. मंत्र्याची संख्या बघता गेल्यावर्षी चार कॅबिनेट मंत्र्यांची निवासाची सोय नागभवनमध्ये करण्यात आली होती त्यात मधुकर चव्हाण, पदमाकर वळवी, वर्षां गायकवाड आणि संजय देवतळे यांचा समावेश होता मात्र यावेळी चारही मंत्र्याची निवासाची व्यवस्था रविभवन परिसरातील कॉटेजमध्ये करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. राज्यमंत्र्याचे निवासस्थान असलेल्या नागभवनमध्ये १६ कुटिर असून त्यातील १२ कुटिरमध्ये राज्यमंत्र्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
एरवी वर्षभर एकही राज्यमंत्री, शासकीय अधिकारी किंवा राज्यमंत्र्याचे कार्यकर्ते नागभवन परिसरात फारसे फिरकत नाही परंतु,अधिवेशनाच्या काळात चांगलीच वर्दळ असते. विशेषत: राज्यमंत्र्याच्या कार्यालयातील कर्मचारी, कार्यकर्ते परिसरात दिसू लागतात. राज्यमंत्र्यांच्या आदरातिथ्य करण्यासाठी अधिकारी कामाला लागले आहेत. रणजित कांबळे, भास्कर जाधव, प्रकाश सोळंकी, सचिन अहीर, फौजिया खान, राजेंद्र मुळक, डी.पी. सावंत, सतेज पाटील आणि राजेंद्र गावित या राज्यमंत्र्याची निवासाची सोय नागभवन परिसरात करण्यात आली आहे. राजेंद्र मुळक यांचे निवासस्थान नागपूरला असल्यामुळे ते कुटीरमध्ये राहतात की खामल्यातील निवासस्थानी हे मात्र अधिवेशन सुरू झाल्यावरच कळेल. अधिवेशनादरम्यान राज्यमंत्र्यांना भेटायला येणाऱ्यांची वर्दळ येथे मोठय़ा प्रमाणात दिसून येते. हैदराबाद हाऊसमध्ये सचिवालय असले, तरी अनेक राज्यमंत्री याठिकाणी बसूनच त्यांच्या विभागाच्या फाईल्स मागवून अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतात. सर्व कुटिरची रंगरंगोटी, फर्निचर आणि सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. सचिवालयात विविध विभागांची कामकाजाला सुरूवात झाली असली, तरी नागभवनातही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कुटिरमध्ये संगणक आणि इतर व्यवस्था करण्यात येणार आहे.