बुधवारच्या गणेश विसर्जनाच्या धामधुमीनंतर शहरातील विविध भागातील तलावांमधून आज सकाळी मोठय़ा प्रमाणात निर्माल्य आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती गोळा करण्यात आल्या आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असे आग्रहाचे निमंत्रण देऊन गणरायाचे विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यामुळे तलावातून निर्माल्य आणि इतर साहित्य बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
 तलावांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन न करता ते कृत्रिम तलावात करण्यासाठी महापालिकेने शहरातील १० तलावांवर तसेच विविध प्रभागांमध्ये कृत्रिम टँकची व्यवस्था केली होती. प्रत्येक ठिकाणी निर्माल्य गोळा करण्यासाठी मोठे कलश ठेवण्यात आले होते. शिवाय विविध पर्यावरण आणि सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते निर्माल्य गोळा करण्यासाठी तलाव परिसरात फिरत होते. या सर्व उपाययोजना आणि जनजागृती केल्यानंतरही अनेक गणेशभक्तांनी शहरातील विविध भागातील तलावांमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करताना प्लास्टिकच्या पिशव्या, हार, फुले तलावात टाकले. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा, नाईक आणि शुक्रवार तलावात आणि परिसरात सर्वाधिक मात्रेने निर्माल्य गोळा करण्यात आले असून दुपापर्यंत काम सुरूच होते.
शुक्रवार आणि फुटाळा तलाव परिसरात फेरफटका मारला असता दुपापर्यंत तीन ट्रक निर्माल्य गोळा करण्यात आले तर ३० ते ३५ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आणि लाकडी पाटय़ा बाहेर काढण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
बुधवारी पहाटे ३ वाजेपर्यंत गणपतीचे विसर्जन करण्यात आल्यानंतर आज सकाळी सात वाजेपासून विविध तलावाजवळ  निर्माल्य गोळा करण्याचे कनक रिसोर्सेसचे कर्मचारी करीत होते. शिवाय काही सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते निर्माल्य गोळा करण्याच्या कामाला भिडले होते. या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार असून भांडेवाडीमध्ये त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवार आणि शुक्रवारी शहरातील मोठय़ा गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे त्यामुळे अजुनही निर्माल्य मोठय़ा प्रमाणात जमा होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे यांनी सांगितले.