विना परवाना तसेच विना गणवेश बेधूंदपणे रिक्षा हाकणाऱ्या शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांना शिस्तीचा धडा देण्यासाठी आगामी सिंहस्थ कुंभमेळा उपयोगी ठरण्याची चिन्हे असून सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रिक्षा चालकांना गणवेश, ओळखपत्र सक्तीचे करण्यात येणार आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकाच्या बाजूस प्रवासी बसवू नये यासाठी दस्तूरखुद्द रिक्षा संघटनेमार्फत रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात झालेल्या बैठकीस शहरातील सर्व ऑटोरिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि नाशिक सिटीझन फोरमचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरात येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच रिक्षा चालकांनी प्रवाशांना सौजन्याची वागणूक द्यावी, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रिक्षा संघटनांचे पदाधिकारी हे शहरातील रेडिओद्वारे रिक्षा चालकांचे प्रबोधन करतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. चालकांनी रिक्षांवर अनधिकृतपणे लावलेल्या जाहिराती, स्टिकर काढून टाकावेत अन्यथा रितसर विहित शुल्क भरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून परवानगी घेण्याची सूचना प्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आली.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार रिक्षा चालकांना पितळी बिल्ल्याऐवजी ओळखपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांनी स्वत:चा परवाना व बिल्ला कार्यालयात आणून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. यापुढे भविष्यात पितळी बिल्ल्याऐवजी ओळखपत्र छातीच्या उजल्या बाजूला लावणे आवश्यक राहील. चालकांनी एक मेपूर्वी आपले ओळखपत्र तयार करून घेण्याचे आवाहन परिवहन विभागामार्फत करण्यात आले आहे.