केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर प्रथमच उपराजधानीत आलेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला जाणे टाळत संघ मुख्यालयासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार अजय संचेती यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर नक्षलवाद प्रश्नावर बैठक घेऊन दिल्लीला रवाना झाले.
गृहमंत्री राजनाथसिंग यांचे सकाळी पावणे अकरा वाजता विमानतळावर आगमन झाल्यावर त्यांचे कार्यकर्त्यांंकडून स्वागत झाल्यानंतर ते रेशीमबागमध्ये स्मृती मंदिर परिसरात सुरू असलेल्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला भेट देतील अशी शक्यता होती. त्यामुळे सकाळपासून त्या भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, राजनाथसिंग यांच्या गाडय़ांचा ताफा थेट विमानतळावरून महालातील संघ मुख्यालयात पोहचला आणि त्यांनी जवळपास दीड तास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी त्यांनी बंदद्वार चर्चा केली. संघशिक्षा वर्गात देशभरातील स्वयंसेवक येत असल्यामुळे त्यांच्यासमोर साधारणत: संघाशी संबंधीत जे वरिष्ठ नेते नागपुरात येत असतात त्यांचे बौद्धिक आयोजित केले जाते. संघ मुख्यालयात सरसंघचालकांशी चर्चा झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहचले. गडकरी सध्या दिल्लीत असल्यामुळे कांचन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. राजनाथसिंग यांनी काही वेळ गडकरी कुटुंबासमवेत घालवल्यानंतर ते भोजणासाठी खासदार अजय संचेती यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यानंतर रविभवनला त्यांनी नक्षल प्रश्नावर त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाबुराव वैद्य यांच्या प्रतापनगरातील निवासस्थानी जाऊन चर्चा केली आणि दिल्लीला रवाना झाले.
दरम्यान, गृहमंत्री राजनाथसिंग यांचे नागपुरात प्रथमच आगमन झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेंडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे आणि महापौर प्रवीण दटके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार अजय संचेती, सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, डॉ. उपेंद्र कोठेकर, दयाशंकर तिवारी, जयप्रकाश गुप्ता, चंदन गोस्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संघ शिक्षा वर्गाला भेट का दिली नाही, अशी विचारणा केली असता राजनाथसिंग यांनी पत्रकारांना सांगितले, संघशिक्षा वर्गात बौद्धिक देण्यासाठी तृतीय संघ शिक्षा वर्ग करणे आवश्यक आहे. मात्र, मी द्वितीय संघ शिक्षा वर्ग केल्यामुळे बौद्धिक देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. संघ शिक्षा वर्गाला भेट देणे टाळण्याचे कारण काहीच नाही. संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली, असेही ते म्हणाले.