डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली ४० वर्षे अखंड राबून उभी केलेली गडचिरोली जिल्ह्य़ातील हेमलकसा गावातील लोकबिरादरी प्रकल्पातील अनोखी दुनिया येत्या १ ते ३ डिसेंबर या कालावधीत छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांसाठी खुली होत आहे. महारोगी सेवा समिती, वरोराव्दारा संचलित लोकबिरादरी प्रकल्पात गेल्या ४० वर्षांतील वाटचालीचे थरारक क्षण जिवंत करणाऱ्या सुमारे १४० छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. केशवराव भोसले नाटय़गृहाच्या कलादालनात हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात छायाचित्रांबरोबरच प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी बनविलेल्या बांबूपासूनच्या हस्तकलेच्या वस्तूही ठेवण्यात येणार आहेत.
आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा म्हणून लोकबिरादरी प्रक ल्पामार्फत बांबू क्राफ्ट प्रशिक्षण व विक्री केंद्राचा उपक्रम चालविला जात आहे. याप्रदर्शनात लोकबिरादरी प्रकल्पाच्या कार्यावर आधारीत व्हिडीओ फिल्म तसेच प्रकाशवाटा, समिधा, नेगल, रानमित्र, एका नक्षलवाद्याचा जन्म इत्यादी पुस्तकेही उपलब्ध असणार आहेत. आदिवासी बांधवांकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या सवरेपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी जवळपास ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ४ कोटी रुपये देणगी मिळविण्यात प्रकल्पाला यश आले असून अजूनही १ कोटी रुपये जमवायचे आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी या दवाखान्यासाठी देणगी स्वीकारण्यात येणार आहे. नागरिकांनी यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन लोकबिरादरी प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे.