ऑस्करसाठी भारतातर्फे गुजराती भाषेतील ‘द गुड रोड’ या चित्रपटाची निवड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी या अनपेक्षित निवडीबद्दल नाकंही मुरडली. मात्र या चित्रपटातील अभिनेता अजय गेही या निवडीवर बेहद्द खूश आहे. या चित्रपटानिमित्त त्याच्याशी मारलेल्या गप्पा..
*‘भारतातर्फे अधिकृत चित्रपट म्हणून ऑस्करसाठी निवड झाल्यावर काय भावना होत्या?
भावना संमिश्र होत्या. एकीकडे या निर्णयावर विश्वासच बसत नव्हता, कारण राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीत आम्ही कुठेच नव्हतो. ही घोषणा झाल्यानंतर आमचा आमच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आम्ही या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली होती, पण त्या मेहनतीचं चीज एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदरात पडेल, हे नक्कीच वाटलं नव्हतं.
*‘गुजराती भाषेतील हा चित्रपट तुला कसा मिळाला?
हा चित्रपट मला मिळाला तो चित्रपटाचे सहनिर्माते आणि सिनेमॅटोग्राफर अमिताभ सिंग यांच्यामुळे! मी मॉडेलिंग करायचो, तेव्हापासून ते मला ओळखतात. त्यांनीच माझं नाव दिग्दर्शकांना सुचवलं. मग आमची एक अनौपचारिक बैठक झाली. दिग्दर्शकांनाही त्या भूमिकेसाठी मी पसंत पडलो. हा गुजराती चित्रपट असला, तरी चित्रपटाची गोष्ट वैश्विक पातळीवरची आहे. ही गोष्ट कोणत्याही देशात, कोणत्याही भाषेत घडू शकते. या चित्रपटात तीन गोष्टींची गुंफण आहे.
*‘चित्रपटासाठी काही वेगळी तयारी केली होतीस का?
हो! त्याशिवाय पर्यायच नव्हता, कारण चित्रपटाची गोष्ट वैश्विक असली, तरीही चित्रपट गुजराती भाषेत होता. त्यामुळे ती भाषा आत्मसात करावी लागली. मी दोन महिने गुजराती शिकत होतो. त्यानंतरच स्क्रिप्ट वाचलं. त्याशिवाय दिग्दर्शकानेही आम्हा कलाकारांसाठी कार्यशाळा, रिसर्च वर्क आणि तालमी ठेवल्या होत्या. साधारणपणे चित्रपटासाठी या गोष्टी केल्या जात नाहीत. मात्र आम्हाला बऱ्याच वेळा बाहेर चित्रीकरण करावं लागलं. या चित्रीकरणाचा खर्च प्रचंड असतो. त्यामुळे आयत्या वेळी काही गोष्टी अडू नयेत किंवा चुकू नयेत, यासाठी आम्ही सगळ्या गोष्टींची तालीम करून गेलो होतो. याचा आम्हाला खूपच फायदा झाला.
*‘एखादा भाषिक चित्रपट करण्याऐवजी मुख्य प्रवाहात यावं, असं नाही का वाटलं?
मला सांग, आपण चित्रपट केव्हा निवडतो? जेव्हा आपल्याला त्या चित्रपटाची कथा पसंत पडते तेव्हा! या चित्रपटाची कथा उत्तम होती. दिग्दर्शकाने ती कथा पडद्यावर मांडण्याआधी चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे यापेक्षा जास्त चांगली संधी मला तरी मिळाली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य प्रवाह म्हणजे तरी काय असतो? हिंदी या भाषेतलाच चित्रपट ना! बडे चित्रपट हे बडय़ा कलाकारांसह केले जातात. मुख्य प्रवाहात गाजणाऱ्या चित्रपटांपेक्षा आपटणाऱ्या चित्रपटांची संख्या कित्येक पटीने जास्त असते. मग, एखाद्या दर्जेदार भाषिक चित्रपटात काम करण्यात गैर काय? त्याहीपुढे जाऊन, एखादा चित्रपट चांगला धंदा करेल की नाही, ही गोष्ट तो चित्रपट प्रदर्शित झाल्याशिवाय कळूच शकत नाही.
*‘सोनाली कुलकर्णीसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसमोर काम करण्याचा अनुभव कसा होता?
पहिल्यांदा थोडा तणाव होता, पण जशी तिच्यासह ओळख वाढली, तिची भेट झाली, तसं एक माणूस म्हणून ती किती चांगली आहे, हे जाणवत गेलं. ती कलाकार म्हणून तर प्रचंडच प्रतिभाशाली आहे. तिला मिळालेल्या पुरस्कारांनी आणि फॅन फॉलोइंगने ते सिद्ध केलं आहे, पण तिची मेहनत करण्याची तयारी खूपच चांगली आहे. छोटय़ातल्या छोटय़ा गोष्टीही ती खूप प्रामाणिकपणे आणि मन लावून करते. तिच्याबरोबर काम करताना मलाही खूप शिकायला मिळालं. आता तर आम्हीच नाही, तर आमच्या दोघांची कुटुंबंही मित्रत्वाच्या नात्यात बांधली गेली आहेत.
*‘द गुड रोड’ची निवड ऑस्करसाठी झाल्यावर बॉलीवूडमधील अनेकांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती. तुला आता त्याबाबत काय वाटतं?
सध्या भारतीय चित्रपटांच्या दुनियेत खूप मस्त कालखंड आहे. खूप चांगले चांगले चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहेत. त्यामुळे कोणता चित्रपट पाहायचा आणि कोणता वगळायचा, याबाबत लोकांमध्येही संभ्रम आहे. आमच्या चित्रपटाची निवड झाल्यानंतर नाराजी व्यक्त करणाऱ्यांनी तेव्हा आमचा चित्रपट कदाचित पाहिला नसावा. ते आमच्या चित्रपटाविरोधात नक्कीच नसतील. त्यांनी फक्त आपलं मत व्यक्त केलं होतं, पण आता त्यांना नक्कीच अभिमान वाटत असेल.
*ऑस्करसाठी तयारी कशी सुरू आहे?
आमचे दिग्दर्शक आणि निर्माते ऑस्करच्या दृष्टीने प्लॅनिंग करत आहेत. तिथे आमच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. आता हळूहळू प्रमोशनल स्ट्रॅटेजीला जोर येईल.