प्रशासनावर अंकुश कुणाचा?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने निष्क्रियतेने कळस गाठला असून ढेपाळल्यागत झालेल्या प्रशासनावर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. विद्यापीठाच्या अनेक विभागात सुस्त प्रशासनाचे अनेक नमुने पहायला मिळतात. खास करून परीक्षा भवनातील परीक्षा विभागात तर प्रशासनाच्या ढेपाळलेपणाने कळस गाठला आहे. कुलगुरू निवडीनंतर अनेक प्राधिकरणांचे गठण झाले नव्हते. त्यामुळे चर्चा किंवा आक्षेप घेणारेही नव्हते. तेव्हापासूनच विद्यापीठ प्रशासनावरील पकड घट्ट करण्याचा कुलगुरूंना चांगला वाव होता. मात्र, प्रशासनावरील पकड कुलगुरूंना घट्ट करता आलेली नसल्याचे बेजबाबदार प्रशासनावरून लक्षात येते. खास करून परीक्षा विभागातील बेजबाबदारपणा नजरेत भरावा असा आहे. याठिकाणी प्रशासन नावाचा प्राणी नसल्याचे चटकन लक्षात येते. गेल्यावर्षी उन्हाळी परीक्षेपासून ते त्यानंतरच्या हिवाळी परीक्षेपर्यंत परीक्षेसंबंधीच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्या कॉपी प्रकार, मास कॉपी, परीक्षेचे अर्ज संबंधित लिपीकाने न भरणे, चुकीचे मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांनक होणे अशा अतिशय गंभीर बाबी समोर आल्या आहेत आणि त्यासाठी संबंधित विषयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनीही बऱ्यापैकी गोंधळ घातला आहे.
काही वर्षांपूर्वी जगभरात गाजलेले कोहचाडे प्रकरण हे उच्च स्तरावर झाल्याचे निदर्शनास येते. मात्र, सध्याची स्थिती अशी आहे की परीक्षा विभागातील लिपीकही हेराफेरी करण्यात गुंतल्याची उदाहरणे दृष्टीस पडत आहेत. परीक्षा विभागातील लिपीक, शिपाई यांचे लागेबांधे त्याठिकाणी निर्माण होऊ नयेत म्हणून दर दोन-तीन वर्षांनी त्यांच्या बदल्या होणे अपेक्षित असताना वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी राहून ते चांगलेच निर्ढावले आहेत.
परीक्षा विभागाच भाग असलेल्या गोपनीय आणि पुनर्मूल्यांकन विभाग हे अतिशय संवेदनशील समजले जातात. मात्र त्या ठिकाणी कोणीही येते आणि कोणीही जाते. कोणालाच त्याठिकाणी धरबंद नसल्याने मासळी बाजार झाला आहे. इतर विद्यापीठातील परीक्षा विभागाकडे अशी सहजता नाही. मूल्यांकन करणाऱ्यांचे ओळखपत्र पाहूनच त्यांना पुढे जाऊ देण्याची तरतूद आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला अजिबात थारा नाही. मात्र नागपूर विद्यापीठ उदार असल्याने चिवडा, भेळ विकणाऱ्यांनाही त्या ठिकाणी प्रवेश आहे. परीक्षा भवनातील अस्वच्छता टोकास गेलेली आहे. प्रसाधनगृहांकडे बघवत नाही, अशी अवस्था आहे आणि त्या ठिकाणी पसरलेला दरुगध असह्य़ होतो इतपत स्थिती आहे. पहिल्या मजल्यावर पाणी येते. त्यानंतर दुसऱ्या किंवा त्यापेक्षा वरती असलेल्या मजल्यावरील विभागांमध्ये पाण्याचा ठणठणाट असतो. महत्त्वाचे म्हणजे सफाई कामगार त्या ठिकाणी काहीही करायला तयार नाहीत. परीक्षा भवन, विद्यापीठ परिसरातील विविध विभाग आणि वि.भि. कोलते ग्रंथालयाच्या परिसरातील सफाई कामगार दादा होऊन बसले आहेत. मनाला वाटेल तेव्हा यायचे किंवा नाही आले तरी त्यांना कोणी बोलणारे उरले नाही. काही सफाई कामगार महापालिकेतील सफाई कामगारांप्रमाणेच पगार बरोबर उचलतात मात्र, स्वत:च्या जागेवर इतरांना पाठवतात, असेही प्रकार विद्यापीठात घडत आहेत. हे सर्व प्रकार कणखर प्रशासनामुळेच आटोक्यात येऊ शकतात? मात्र, जेथे प्रशासनातील अधिकाऱ्यांनाच गुटखा, तंबाखूशिवाय कामे करता येत नाहीत, ते इतरांना चाप कसे लावणार?